महापालिका सभागृहाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन झाल्यानंतर आयुक्त महेश पाठक लगेचच सन २०१४-१५ या आर्थिक वर्षांसाठीचे अंदाजपत्रक सादर करणार असून बहुचर्चित मेट्रो, बीआरटी, पाणीपुरवठा आदी प्रकल्पांसाठी, तसेच नव्या प्रकल्पांसाठी अंदाजपत्रकात किती तरतूद होणार याबाबत उत्सुकता आहे. महापालिकेच्या उत्पन्नात झालेली घट आणि रखडलेले प्रकल्प या पाश्र्वभूमीवर हे अंदाजपत्रक सादर होईल.
महापालिका सभागृहाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता झाल्यानंतर दुपारी बारा वाजता आयुक्त त्यांचे अंदाजपत्रक सादर करतील. चालू आर्थिक वर्षांत जकात रद्द होऊन स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) लागू झाला आहे. मिळकत कराची वसुली यंदा प्रशासनाच्या अपेक्षेप्रमाणे होणार असली, तरी एलबीटी वसुलीबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. तसेच एलबीटीचा राज्य शासनाचा हिस्सा दर महिन्याला मिळत राहणे ही देखील महापालिकेसाठी आवश्यक गोष्ट ठरली आहे.
येत्या वर्षांत मेट्रोसह बीआरटीचे नवे मार्ग, पीएमपीसाठी गाडय़ांची खरेदी, पाणीपुरवठा प्रकल्पांची चालू कामे आदींसाठी आयुक्त किती तरतूद करतात याकडे लक्ष लागले आहे. महापालिका आयुक्तांनी गेल्यावर्षी ३,६०५ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात ५६२ कोटी ५० लाख रुपयांची वाढ करून स्थायी समितीने ते ४,१६७ कोटींवर नेले होते.
नव्या सभागृहात आज आयुक्तांचे अंदाजपत्रक
महापालिका सभागृहाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता झाल्यानंतर दुपारी बारा वाजता आयुक्त त्यांचे अंदाजपत्रक सादर करतील.
First published on: 17-01-2014 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gb hall budget brt pmc