पुणे : पुण्यात ९ जानेवारीपासून गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक होऊन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. सिंहगड रस्ता परिसरात हा उद्रेक झाला होता. या भागात १८ फेब्रुवारीपासून एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे पुण्यातील जीबीएसचा उद्रेक संपुष्टात आल्याचे पत्र महापालिकेचा आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठविले आहे.

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड गाव परिसरात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. या जीबीएस उद्रेकग्रस्त भागात १८ फेब्रुवारीपासून एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. सर्वसाधारणपणे एखाद्या आजाराचा शेवटचा रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या अधिशयन काळाच्या दुप्पट कालावधीत एकही नवीन रुग्ण न आढळल्यास तो उद्रेक संपुष्टात आल्याचे जाहीर केले जाते. पुण्यात नोरोव्हायरस आणि कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी यांचा संसर्ग जीबीएस उद्रेकास कारणीभूत ठरला होता.

‘महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोरोव्हायरस आणि कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी या दोन्हींसाठी ८ ते १० दिवसांचा अधिशयन कालावधी निश्चित केला होता. उद्रेकग्रस्त भागात शेवटचा रुग्ण आढळून आता २७ दिवस झाले आहेत. अधिशयन कालावधीच्या दुप्पट काळात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे पुण्यातील जीबीएसचा उद्रेक संपुष्टात आल्याचे पत्र महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक आणि उपसंचालक यांना पाठविण्यात आले आहे. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर हा उद्रेक संपुष्टात आल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात येईल,’ अशी माहिती महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.

राज्यात जीबीएसचे आतापर्यंत २३० रुग्ण आढळून आले असून, त्यातील २०२ रुग्णांचे जीबीएस निदान झाले आहे. पुण्यात जीबीएसचे आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले असून, त्यात पुणे महापालिका ४६, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे ९५, पिंपरी-चिंचवड महापालिका ३४, पुणे ग्रामीण ४० अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात इतर जिल्ह्यांत आतापर्यंत १५ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत जीबीएसमुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात १० आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील जीबीएस प्रादुर्भाव

एकूण रुग्णसंख्या –                            २३०

रुग्णालयात दाखल –                           ३३

अतिदक्षता विभागात –                      २४

व्हेंटिलेटरवर –                                         १६

बरे झालेले रुग्ण –                                १८५

मृत्यू –                                                        १२

पुण्यात जीबीएसचा उद्रेक होण्यास कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचा संसर्ग कारणीभूत ठरला होता. या दोन्हींच्या अधिशयन कालावधीच्या दुप्पट काळात एकही नवीन रुग्ण उद्रेकग्रस्त भागात आढळून आलेला नाही. त्यामुळे जीबीएस उद्रेक संपुष्टात आल्याचे पत्र सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठविले आहे. – डॉ. नीना बोराडे, आरोग्य प्रमुख, महापालिका