पुणे : ‘राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णसंख्येतील वाढ केवळ पुण्यापुरती मर्यादित आहे. पुण्यातही सिंहगड रस्ता परिसरातच या आजाराचा उद्रेक दिसून येत आहे. राज्यात इतरत्र जीबीएस रुग्णांची संख्या नेहमीएवढीच असून, त्यात वाढ झालेली नाही. यामुळे पुढील काळात पुण्यातील जीबीएस व्यवस्थापनावर अधिकाधिक भर देण्यात येणार आहे,’ असे शीघ्र प्रतिसाद पथकाने सोमवारी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने शीघ्र प्रतिसाद पथकाची स्थापना केली. या पथकाची बैठक सोमवारी झाली. या बैठकीत राज्यातील जीबीएसच्या रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात आला. या वेळी पुणे वगळता राज्यात इतरत्र जीबीएस रुग्णसंख्येत गेल्या काही वर्षांच्या तुलनेत वाढ नोंदविण्यात आली नसल्याचे समोर आले. पुण्यातही केवळ सिंहगड रस्ता परिसरात रुग्णसंख्येत जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्याबाहेरील रुग्ण आणि त्यांची तपासणी करण्याऐवजी पुण्यातील आजार व्यवस्थापनावर लक्ष देण्यावर बैठकीत भर देण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात जीबीएसचे १६३ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील १२७ जणांचे जीबीएसचे निदान झाले आहे. त्यात पुणे महापालिकेच्या हद्दीतील ३२, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील ८६, पिंपरी-चिंचवड महापालिका १८, पुणे ग्रामीण १९ आणि इतर जिल्ह्यांतील ८ रुग्ण आहेत. सध्या ४७ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, २१ जण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यात आतापर्यंत ४७ रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत.

पालिका रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट

‘महापालिकेच्या मुरलीधर पांडुरंग लायगुडे रुग्णालयात रुग्णांवरील उपचारासाठी दोन फिजिओथेरपिस्ट नेमण्यात आले आहेत. जीबीएस रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना पायावर उभे राहून चालण्यास ३ ते ६ महिन्यांचा कालावधी लागतो. अशा रुग्णांना त्यांच्या पायावर लवकर उभे करण्यास फिजोओथेरपिस्ट महत्त्वाची भूमिका बजावितात. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.

जीबीएस रुग्णसंख्या

वयोगट रुग्ण
० ते ९२४
१० ते १९२२
२० ते २९३५
३० ते ३९२०
४० ते ४९१८
५० ते ५९२५
६० ते ६९१४
७० ते ७९
८० ते ८९
एकूण १६३
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gbs rapid response team confirms that they focus on pune in state pune print news stj 05 mrj