पुणे : जीई एरोस्पेस कंपनीने पुण्यातील उत्पादन प्रकल्पाचा विस्तार आणि त्याचे अद्ययावतीकरण करण्यासाठी २४० कोटी रुपयांची गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे कंपनीला नवीन प्रकल्प सुरू करण्यास आणि उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी यंत्रसामग्री वाढविण्यास मदत होणार आहे. याबाबत जीई एरोस्पेसचे उपाध्यक्ष (जागतिक पुरवठा साखळी) माईक कॉफमन म्हणाले की, पुण्यातील आमच्या बहुउद्देशीय उत्पादन प्रकल्पात सुरक्षा, गुणवत्ता आणि ग्राहकांना चांगली सेवा देण्यावर भर दिला जात आहे. या प्रकल्पाचा विस्तार होत असल्याचा मला आनंद आहे.
आमच्या विमान इंजिनांच्या जागतिक पुरवठा साखळीत हा प्रकल्प महत्वाची भूमिका पार पाडेल. भारतातील विमान निर्मिती क्षेत्रातील आमची गुंतवणूक कंपनीच्या वाढीस पूरक ठरेल. यातून आमच्या ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासही मदत होईल.
हेही वाचा…पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीई एरोस्पेसच्या प्रकल्पाचे फेब्रुवारी २०१५ मध्ये उद्धाटन केले होते. विमान इंजिनच्या सुट्या भागांचे उत्पादन या प्रकल्पात होते. या प्रकल्पातून जीईच्या जगभरातील उत्पादन प्रकल्पांना सुट्या भागांचा पुरवठा केला जातो. त्याचा वापर करून जी ९०, जीईएनएक्स आणि जीई९एक्स या विमान इंजिनची निर्मिती होत आहे. या प्रकल्पातून ५ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना विमान इंजिन निर्मितीमध्ये प्रशिक्षित करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.