पुणे : त्या काळामध्ये अगदी थोड्या लोकांकडे असलेल्या रेडिओला पुष्पहार अर्पण करून निरांजनाने औक्षण करून अगरबत्तीच्या मंद सुवासामध्ये महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायणा’च्या गीतांचा श्रवणानंद घेण्याची किमया तब्बल ५६ आठवडे साधली गेली. ‘गीतरामायणा’ची सप्तदशकपूर्ती होत असताना या आठवणींना उजाळा देत विविध मान्यवरांनी मराठी भावसंगीतामधील ‘गीतरामायणा’चे महत्त्व अधोरेखित केले.

‘स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती’ या ‘गीतरामायणा’तील पहिल्या गीताचे आकाशवाणी पुणे केंद्रावरून १ एप्रिल १९५५ रोजी प्रसारण झाले. त्या घटनेला मंगळवारी ७० वर्षे पूर्ण होत आहेत. हे गीत ऐकत असताना आपण दीर्घकाळ स्मरणात राहील, असे काही तरी अद्वितीय ऐकतो आहे, याची प्रचिती आल्याचे श्रोत्यांनी सांगितले. हे ‘गीतरामायण’ रसिकांना मोहीत करणार याची चुणूक या पहिल्याच गीतातून आली होती, याकडे लक्ष वेधण्यात आले.

‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ हे गीतरामायणाचे मूळ गीत नव्हतेच. ३१ मार्च १९५५ रोजी गीतरामायणाच्या पहिल्या गीताचे ध्वनिमुद्रण व्हायचे होते. पण, गदिमांनी लिहिलेल्या गीताचा कागद सापडत नव्हता. त्या वेळी गदिमा आणि बाबूजी यांच्यामध्ये तात्त्विक वादही झाला होता. अखेरीस आकाशवाणीचे अधिकारी सीताकांत लाड यांनी गदिमांना ताबडतोब दुसरे गीत लिहून देण्यास सांगितले. शब्दप्रभू गदिमांनी अवघ्या १५ मिनिटांत हे गीत लिहिले आणि रात्रीत बाबूजींनी त्याची स्वररचना केली. १ एप्रिलच्या सकाळी ते गीत आकाशवाणीवरून प्रसारित झाले होते, अशी आठवण सुधीर फडके यांचे पुत्र व संगीतकार-गायक श्रीधर फडके यांनी सांगितली. हे गीत प्रसारित झाले तेव्हा मी पाच वर्षांचा होतो, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थिदशेत पुण्यामध्ये बी.ए.च्या अंतिम परीक्षेपूर्वी मित्राकडे गेलो असताना त्याच्याकडे १ एप्रिल १९५५ रोजी रेडिओवर प्रसारित झालेले ‘गीतरामायणा’चे पहिले गीत मी ऐकले होते. गावाकडे (देगलूर) असतो, तर घरामध्ये रेडिओ नसल्याने ते गीत ऐकणे शक्य झाले नसते. त्या वेळी मला त्या गीताचे आकर्षण वाटले नव्हते. एखाद्या भावगीतासारखे वाटले. ‘जय गंगे भागीरथी’, ‘निरोप माझा कसला घेता जेथे राघव तेथे सीता’ अशी गाणी ऐकल्यानंतर शब्दरचना आणि चाल हातात हात घालून कशी चालते याची प्रचिती आली. कालांतराने पाचव्या गीतापासून ‘गीतरामायणा’चे गारूड रसिकांच्या मनावर होते, याची जाणीव झाली.

डाॅ. गो. बं. देगलूरकर, मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक

‘गीतरामायणा’चे पहिले गीत आकाशवाणीवरून प्रसारित झाले त्या वेळी मी साडेअकरा वर्षांचा होतो. नाना पेठेतील भोर्डे आळी येथील वाड्यामध्ये त्या काळी वडिलांनी नुकताच रेडिओ घेतला होता. मुलांसह त्यांचे आई-वडील, घरातील ज्येष्ठ असे सगळे जण वाड्याच्या अंगणात सतरंजी टाकून गीतरामायण ऐकायचो. त्या गीतांचा अर्थ समजण्याचे माझे वय नव्हते. पण, काही तरी अद्भुत कानावर पडत असल्याची जाणीव नक्की झाली. पुढे राजकीय-सामाजिक जीवनामध्ये काम करताना गदिमांच्या सहवासात आलो. ‘गीतरामायणा’च्या पुण्यात झालेल्या रौप्यमहोत्सवी आणि सुवर्णमहोत्सवी समितीचा मी उपाध्यक्ष होतो.

उल्हास पवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते

‘गीतरामायणा’चे प्रसारण होणार म्हणून त्या वेळी अण्णांनी (गदिमा) जुना अमेरिकी रेडिओ घेतला होता. त्या रेडिओवरच आम्ही मुलांनी गीतरामायण ऐकल्याचे मला आठवत आहे. गदिमांच्या काव्याचा अर्थ समजण्याचे माझे वय नक्कीच नव्हते. पण, त्या वेळी बाबूजींच्या आवाजातील माधुर्यामुळे गीतरामायण लक्षात राहिले.

आनंद माडगूळकर, गदिमांचे पुत्र

‘गीतरामायणा’चे पहिले गीत प्रसारित झाले त्या वेळी मी जामखेड (जि. अहिल्यानगर) येथे वास्तव्यास होतो. आमच्याकडे रेडिओ नसल्याने मी ते ऐकू शकलो नाही. पण, त्या काळी ‘केसरी’मध्ये गीतरामायणाचे प्रत्येक गीत प्रसिद्ध होत असे. ‘दुधाची तहान ताकावर’ या उक्तीनुसार वाचूनच मी त्याचा आनंद घेतला. पुढे गदिमा आणि बाबूजी यांच्या सहवासात आल्यानंतर बाबूजी सादर करीत असलेले गीतरामायण श्रोत्याच्या भूमिकेतून ऐकले. माझा जन्म रामनवमीचा असल्याने वडिलांनी माझे नाव रामदास ठेवले.

रामदास फुटाणे, वात्रटीकाकार