‘सरयू तीरावरी अयोध्या मनूनिर्मित नगरी’.. ‘दशरथा घे हे पायसदान’.. ‘स्वयंवर झाले सीतेचे’.. ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा’.. ‘सूड घे त्याचा लंकापती’..‘मोडू नको वचनास नाथा’.. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’.. स्वच्छ वाणी, स्पष्ट शब्दोच्चार आणि गायनातील हरकतींसह विविध भावछटा उलगडत केलेल्या गायनातून गीतरामायणाचे शिवधनुष्य युवा कलाकारांनी समर्थपणे पेलले. अकरा गायक कलाकारांनी सादर केलेल्या प्रत्येकी दोन अशा २२ गीतांचे श्रवण करताना रसिकांनी गीतरामायणाच्या अवीटतेची गोडी नव्याने चाखली.
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार असलेले गीतरामायण येत्या रामनवमीला ६० वर्षे पूर्ण करीत आहे. हे औचित्य साधून गदिमा प्रतिष्ठान आणि स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे गीतरामायण गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अगदी वयाच्या दहा वर्षांच्या मुलापासून ते ऐंशी वर्षांच्या आजोबांपर्यंत ४२ स्पर्धकांनी या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये सहभाग घेतला होता. प्रमोद रानडे आणि अपर्णा संत यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिले होते. त्यातील ११ स्पर्धकांमध्ये अंतिम फेरी सोमवारी रंगली. गीतरामायणाचा वारसा पुढे नेणारे श्रीधर फडके आणि आनंद माडगूळकर यांनी अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
प्रद्युम्न पोंक्षे या ११ वर्षांच्या मुलापासून ते ८० वर्षांचे अरिवद भालेराव अशा ११ स्पर्धकांमध्ये अंतिम फेरी झाली. अमिता घुगरी हिने प्रथम क्रमांक पटकाविला. शंतनू पानसे याने द्वितीय क्रमांक आणि स्वामिनी कुलकर्णी हिने तृतीय क्रमांक मिळविला. गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर आणि स्वरानंद प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे या वेळी उपस्थित होते.
गीतरामायण हे शास्त्रीय संगीतावर आधारित सुगम गायन असे म्हटले जात असले तरी ते सोपे नाही. शब्दोच्चार, लय, ताल आणि भावभावना यांचे मिश्रण असलेले गीतरामायण गाणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे, याकडे लक्ष वेधून श्रीधर फडके यांनी, मराठी भाषा जिवंत आहे तोपर्यंत गीतरामायण अजरामर राहणार असल्याचे सांगितले. शब्द-सुरांचे माहात्म्य असे आहे, की ६० वर्षांनंतरही गीतरामायणाची जादू कायम आहे. या महासागरामध्ये जेवढे खोल जाऊ तेवढी रत्ने हाताशी लागतील, असे आनंद माडगूळकर यांनी सांगितले.
स्मृती पहिल्या गीतरामायण गायनाच्या
१९५८ च्या मे महिन्यात माझी आणि आनंदची मुंज होती. त्या वेळी गदिमा आणि बाबूजी यांची कारकीर्द ऐन बहरामध्ये होती. घरामध्ये जमलेल्या गोतावळ्याचे मनोरंजन करण्याच्या उद्देशातून गीतरामायणाचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम झाला होता. बाबूजींच्या गायनाला खुद्द गदिमांनीच निवेदन केले होते. त्यावेळी वाकडेवाडी परिसरातील नागरिक आणि रात्रपाळी संपवून घराकडे परतणाऱ्या दारुगोळा कारखान्यातील कामगारांनी सायकली बाजूला लावून या गीतरामायणाचा आनंद लुटला होता, अशी आठवण श्रीधर माडगूळकर यांनी सांगितली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा