महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्या अलौलिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायणा’चे तराणे आता नव्या गायकांच्या स्वरांतून रसिकांना अनुभवता येणार आहेत.
‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती’ हे गीतरामायणातील पहिले गीत आकाशवाणी पुणे केंद्रावरून १ एप्रिल १९५५ रोजी प्रसारित झाले होते. त्या घटनेला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी संस्कृतीचे सुवर्णपान असलेल्या गीतरामायणाची मोहिनी मराठी मनांवर अजूनही टिकून आहे. गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवाचे औचित्य साधून गदिमा प्रतिष्ठान आणि स्वरानंद प्रतिष्ठान यांनी गीतरामायण गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. नव्या पिढीतील गायक-गायिकांनी या अजोड निर्मितीचा स्वत: अनुभव घ्यावा हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. स्पर्धक अगदी संगीत विशारद नसला तरी त्याला शब्दोच्चार आणि भावार्थासह संगीताचे प्राथमिक ज्ञान असावे एवढीच अट असलेल्या या स्पर्धेसाठी १२ वर्षे ७० वर्षे वयापर्यंतच्या ४२ जणांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी अपर्णा संत आणि प्रमोद रानडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या फेरीतून निवड झालेल्या गायक-गायिकांची सोमवारी (१६ मार्च) निवारा सभागृह येथे अंतिम फेरी होणार आहे. गदिमा-बाबुजींच्या गाण्यांचा वारसा पुढे सुरू ठेवणारे आनंद माडगूळकर आणि श्रीधर फडके हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या कलाकारांना ज्येष्ठ संगीतकार-व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत, अशी माहिती स्वरानंद प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे यांनी दिली.
अनफरगॉटेबल.. अनयुज्वल
प्रसिद्ध कवी-गीतकार, संगीतकार आणि गेल्या काही वर्षांत छंद जोपासून झालेले चित्रकार हे सुधीर मोघे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांच्या चाहत्यांना नेहमीच हवेहवेसे वाटतात. त्यातील एक पैलू म्हणजे त्यांचा चित्रपटसंगीताचा अफाट व्यासंग. या व्यासंगातून त्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘अनफरगॉटेबल.. अनयुज्वल’ या हिंदूी चित्रपटसंगीताचा आढावा घेणाऱ्या ध्वनिचित्रफितीचा आस्वाद रविवारी (१५ मार्च) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे प्रेक्षागृह येथे सकाळी दहा वाजता घेता येणार आहे. सुधीर मोघे यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ध्वनिचित्रफितीची निर्मिती सुधीर मोघे यांचे लंडन येथील स्नेही अशोक देशपांडे यांनी केली आहे. ज्येष्ठ अॅकॉर्डियनवादक आणि संगीतसंयोजक इनॉक डॅनियल्स यांच्या हस्ते या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सुधीर मोघे यांनी किलरेस्करवाडी येथील किलरेस्कर कारखान्याला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने तयार केलेला ‘आधी बीज एकले’ हा माहितीपट दाखविला जाणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2015 रोजी प्रकाशित
नव्या गायकांच्या ओठी गीतरामायणाचे तराणे
‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती’ हे गीतरामायणातील पहिले गीत आकाशवाणी पुणे केंद्रावरून १ एप्रिल १९५५ रोजी प्रसारित झाले होते.
First published on: 13-03-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geet ramayan sudhir phadke g d madgulkar