अधिसभेचा कार्यकाळ संपुष्टात आला असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तब्बल ९८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.पुणे विद्यापीठाचे पदवीधर तसेच पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आणि पुणे विद्यापीठाची स्थापना होण्यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या व्यक्ती विद्यापीठात नोंदणीकृत पदवीधर म्हणून नाव नोंदविण्यास देण्यात आलेली मुदत गुरुवारी संपली. त्यामध्ये दिलेल्या मुदतीत खुल्या प्रवर्गातून ४६, अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून २४, विमुक्त जाती-भटक्या जमाती (डीटीएनटी) प्रवर्गातून ९, इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) १७, असुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून ४ आणि महिला प्रवर्गातून ८ असे एकूण ९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. शुक्रवारी (४ नोव्हेंबर) आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार असून शनिवार (५ नोव्हेंबर) हा अर्ज माघारी घेण्यासाठीची मुदत असणार आहे. २० नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडेल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>>पुण्यात हंगामात दुसऱ्यांदा नीचांकी तापमान ; उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ विकास मंचच्या दहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी मंचचे समन्वयक राजेश पांडे, डॉ. राजेंद्र विखे, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. अपूर्व हिरे उपस्थित होते. विद्यापीठ विकास मंचच्या वतीने पुण्यातील प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, संतोष ढोरे, दादाभाऊ शिनलकर, राहुल पाखरे, गणपत नांगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नगरमधून युवराज नरवडे आणि सचिन गोरडे यांना तर, नाशिकमधून विजय सोनवणे आणि सागर वैद्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे.