पुणे : ‘संशोधन आणि विकास, उत्पादनासाठी पुण्याचे महत्त्व मोठे आहे. दारूगोळा, वाहन उत्पादन अशा सर्वच बाबतीत पुणे ‘पॉवर हाउस’ झाले आहे,’ या शब्दांत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्करासाठी पुण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बॉम्बे इंजिनिअर ग्रुप’च्या संचलन मैदानावर लष्करदिनानिमित्त झालेल्या संचलनानंतर जनरल द्विवेदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुणेस्थित दक्षिण मुख्यालयाचे महत्त्व विषद करताना ते म्हणाले, ‘दक्षिण मुख्यालय हे सर्वांत मोठ्या मुख्यालयांपैकी एक आहे. देशातील ११ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेश असा एकूण ४१ टक्के भूभाग या मुख्यालयाच्या अखत्यारित येतो. नौदलाची तीन मुख्यालये, हवाई दलाची चार मुख्यालयेही लष्कराच्या दक्षिण मुख्यालयांतर्गत आहेत. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दक्षिण मुख्यालय सज्ज आहे. काही देशांबरोबरचे लष्करी सरावही याच मुख्यालयांतर्गत केले जातात. संरक्षण क्षेत्रासाठीचे आवश्यक सर्व उद्योग या मुख्यालयांतर्गत आहे. त्यामुळे नवे तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास, उत्पादन दक्षिण मुख्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध होते. येत्या परिवर्तनाच्या काळात दक्षिण मुख्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.’

हेही वाचा >>>अडलेले ‘पाऊल’ पडले पुढे! पादचारी पूल आवश्यक ठिकाणीच; असलेल्या पुलांवर महापालिकेची स्वच्छता मोहीम

संचलनात आत्मनिर्भरतेवर भर देण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, ‘आज भारतीय लष्कराचा ८५ टक्के भांडवली खर्च स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांवर होत आहे. संचलनामध्ये सादरीकरणातील रोबो, वज्र असे सारे काही भारतीय बनावटीचे होते. आत्मनिर्भरता म्हणजे स्वयंपूर्ण होणे. मानसिक स्वयंपूर्णता, औद्योगिक स्वयंपूर्णता, भारतीय दृष्टीने विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करणे या तीन प्रकारे मी स्वयंपूर्णतेकडे पाहतो.’

पुढील वर्षी माजी सैनिक, उद्योगांचाही समावेश

‘पुढील वर्षात लष्करदिनीनिमित्तच्या संचलनासाठी गुवाहाटी, जयपूर, भोपाळ, जबलपूर अशी शहरे निवडली आहेत. यावर समिती नियुक्त करून आवश्यक सुविधांची उपलब्धता असलेल्या शहराची निवड केली जाईल. पुढील वर्षी माजी सैनिक, संरक्षण उत्पादन करणारे उद्योग यांनाही सहभागी करून घेण्याचा विचार आहे,’ असे लष्करप्रमुख म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: General dwivedi expressed his views on pune on the occasion of army day at the parade ground of the bombay engineer group pune print news ccp14 amy