सर्वसाधारण उपचार करणाऱ्या ‘जनरल प्रॅक्टिशनर’ डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शहरात सुमारे आठ हजार जनरल प्रॅक्टिशनर्स असून प्रत्यक्षात केवळ २१७० डॉक्टरांनीच पुणे महानगरपालिकेकडे या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे नोंदणी न केलेले इतर डॉक्टर्स आपल्या क्लिनिकमध्ये तयार होणारा जैववैद्यकीय कचरा जाळून अथवा पुरून टाकत असल्याची शक्यता समोर आली आहे.
‘मनपातर्फे मिळणारी जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीची सेवा गैरसोयीची असल्याने या सेवेसाठी नोंदणी न करण्याकडे डॉक्टरांचा कल असल्याचे’, जन आरोग्य मंच या संघटनेचे निमंत्रक डॉ. शेखर बेंद्रे यांनी सांगितले. डॉ. बेंद्रे म्हणाले, ‘‘मनपाने कंत्राट दिलेल्या कंपनीच्या जैववैद्यकीय कचरा गोळा करणाऱ्या गाडय़ा शहरात ठरावीक रस्त्यांवर उभ्या राहतात, मात्र डॉक्टरांकडे कचरा नेऊन देण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते. या सेवेसाठी प्रतिवर्षी तीन हजार रुपये शुल्क आकारले जाते. डॉक्टरांकडे फारसा जैववैद्यकीय कचरा निर्माण होत नाही. ड्रेसिंग केलेले कापसाचे बोळे, सिरिंजेस, निडल्स असा सुमारे २ किलोंचा कचरा प्रतिमहिना तयार होतो. शहरात सुमारे ८ ते १० हजार प्रॅक्टिशनर्स असून यांपैकी बऱ्याच जणांनी मनपाच्या जैववैद्यकीय कचरा विल्हेवाटीच्या सेवेसाठी नोंदणी केलेली नाही. या सेवेतील त्रुटी आणि जास्त शुल्क ही नोंदणी न करण्याची कारणे असू शकतील. नोंदणी न केलेले काही डॉक्टर्स क्लिनिकमध्ये तयार झालेला जैववैद्यकीय कचरा जाळून वा पुरून टाकत असल्याची शक्यता आहे.’’
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक वैद्यकीय अधिकारी आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रमुख किशोर पाखरे म्हणाले, ‘‘शहरातील २१७० जनरल प्रॅक्टिशनर्सनी जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पालिकेकडे नोंदणी केली आहे. शहरात एकूण ७ ते ८ हजार जनरल प्रॅक्टिशनर्स असण्याची शक्यता आहे. पालिकेच्या निरीक्षकांनी केलेल्या ५१५ वैद्यकीय आस्थापनांच्या तपासणीत केवळ १७६ आस्थापनांचीच नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले. वैद्यकीय आस्थापनांना या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी नोंदणी करण्याची मुदत वाढवून देऊन ती ३० जून २०१३ करण्यात आली आहे. त्यानंतरही नोंदणी न केल्याचे आढळल्यास पालिकेतर्फे कारवाई करण्यात येईल.’’
जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी नोंदणी करण्यापासून डॉक्टरांचा दूरच
सर्वसाधारण उपचार करणाऱ्या ‘जनरल प्रॅक्टिशनर’ डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-05-2013 at 01:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: General practitioner doctors ignoring bio medical waist