कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्यास राज्यातील पुरुषांची मानसिकता अजूनही तयार होत नसल्याचे समोर आले आहे. या वर्षी आतापर्यंत झालेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांच्या आकडेवारीत शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या पुरुषांचे प्रमाण केवळ दोन टक्के तर महिलांचे प्रमाण मात्र ९८ टक्के आहे. धक्कादायक बाब म्हणजे वाशिम जिल्ह्य़ात तसेच उल्हासनगर, मालेगाव, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, अकोला आणि चंद्रपूर या महापालिकांमध्ये यावर्षी एकाही पुरुषाने नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतलेली नाही.
राज्यात कुटुंब नियोजनाच्या एकूण शस्त्रक्रियांमध्ये एक किंवा दोन अपत्यांनंतर शस्त्रक्रिया करून घेण्याचे प्रमाण गेल्या वर्षी ६८ टक्के तर या वर्षी आतापर्यंत हे प्रमाण ६५ टक्के आहे. ही बाब कौतुकास्पद असली तरी एकूण शस्त्रक्रियांमध्ये पुरुषांचे अत्यल्प असलेले प्रमाण वाढवण्यात मात्र राज्याला यश आलेले नाही. कितीही प्रबोधन केले तरी पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी तयार होत नसल्याचे वास्तव या आकडेवारीवरून उघड झाले आहे.
राज्याचे नोडल ऑफिसर (पीसीपीएनडीटी) डॉ. सुधाकर कोकणे म्हणाले, ‘पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया सोपी, कमी खर्चीक असते. या शस्त्रक्रियेबद्दल सातत्याने प्रबोधन करूनही पुरुषी मानसिकता बदलत नसल्याचे दिसून आले आहे.’
या वर्षी बृहन्मुंबई महापालिकेनंतर पुरुषांच्या शस्त्रक्रियेत पुणे महापालिका राज्यात आघाडीवर आहे. बृहन्मुंबई महापालिकेत या वर्षी ३५७ तर पुणे महापालिकेअंतर्गत ५४ नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. स्त्रिया प्रसूतीसाठी दवाखान्यात दाखल झाल्यानंतर बाळंतपणाबरोबरच त्यांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियाही करून घेण्याकडे अधिक कल असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपप्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी मीरा भाईंदर, उल्हासनगर आणि मालेगाव महानगरपालिकांत वर्षभरात एकाही पुरुषाने शस्त्रक्रिया करून घेतली नव्हती, तर वाशिम जिल्ह्य़ात आणि ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, धुळे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नांदेड, अकोला, अमरावती या महापालिकांत ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या पुरुषांची संख्या दहाच्या वर गेली नव्हती. विशेष म्हणजे गेल्या वर्षी गडचिरोली जिल्ह्य़ात नसबंदी करून घेणाऱ्या पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ३४३२ होते. त्याखालोखाल गोंदिया (२४११), नाशिक(१४४७), चंद्रपूर (१४३९), बृहन्मुंबई महापालिका (१३४३) आणि भंडारा (१३०६) जिल्ह्य़ाचा क्रमांक आहे.  
या वर्षी (एप्रिल ते जुलै २०१३) झालेल्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांच्या आकडेवारीनुसार-
एकूण शस्त्रक्रिया-                                                             १,४०,६७६
एक किंवा दोन अपत्यांनंतर  झालेल्या एकूण शस्त्रक्रिया-      ९२,४५१
पुरुषांच्या नसबंदी शस्त्रक्रिया –                                                 २८२३

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा