‘ब्रँडेड’ औषधांच्या किमतींबरोबरच जेनेरिक औषधांच्या छापील किमतीही कमी करणे गरजेचे आहे. नागरिकांना जेनेरिक औषध वेगळे ओळखता यावे यासाठी औषधाच्या वेष्टनावर तसे नमूद किंवा चिन्हांकित करता येईल का याचाही विचार व्हायला हवा, असे मत ‘आरोग्य सेना’ या संघटनेचे संस्थापक डॉ. अभिजीत वैद्य यांनी व्यक्त केले.
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्यास केलेल्या विरोधाचा संघटनेने रविवारी आरोग्य अदालत घेऊन निषेध नोंदवला. या वेळी डॉ. वैद्य बोलत होते.
जेनेरिक औषधांची साखळी दुकाने राज्यात उघडण्याच्या आधीच्या सरकारने घेतलेला निर्णय पूर्ण करणे आवश्यक आहे असे सांगून ते म्हणाले,‘जेनेरिकबाबत अजूनही नागरिकांमध्ये गैरसमज असून राज्यात दुकाने उभी राहिलेली नसतानाच त्याला आरोग्य मंत्र्यांनी विरोध करणे चुकीचे आहे. यात बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांशी साटेलोटे असल्याची शंका येते. सरकारी यंत्रणेत जेनेरिक औषधे पुरेशी उपलब्ध नाहीत. ‘ब्रँडेड’ औषधांच्या अवास्तव किमतींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. औषध दुकानदार जेनेरिक औषधे विक्रीस ठेवतात, परंतु ती जेवढी स्वस्त द्यायला हवीत त्या किमतीत देत नाहीत. अनेकदा जेनेरिक औषधांचीही छापील किंमत प्रचंड असल्याचे दिसते, पण त्यावर ५० ते ६० टक्के सूट देऊन विकण्यासारखी परिस्थिती असते. या औषधांच्या वेष्टनावर ‘जेनेरिक’ असे नमूद करणे शक्य आहे का, याचाही विचार व्हायला हवा, परंतु असे झाल्यास जेनेरिकची छापील किंमत कमी ठेवावी लागेल. शिवाय, जेनेरिक औषधांची निर्मिती करण्याची परवानगी केवळ दर्जेदार कंपन्यांनाच द्यावी.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा