पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी – पीएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेच्या प्रक्रियेला पुढील आठवडय़ात सुरुवात होत आहे. येत्या १० जानेवारीपासून मार्गिकेचे भू-आरेखनाचे काम टाटा-सिमेन्सकडून केले जाणार आहे.
पीएमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक पार पडली. पीएमआरडीएकडून सध्या सुरु असलेल्या विविध विकास कामांसह वर्तुळाकार रस्ता, नगररचना योजना यांचाही या वेळी आढावा घेण्यात आला.
पीएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकेचे काम टाटा-सिमेन्स कंपनीकडून करण्यात येणार आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी या वेळी सादरीकरण केले. मेट्रोचे १० जानेवारीपासून प्रत्यक्ष मूळ भू-आरेखन (ग्राउंड मार्किंग) सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मेट्रो मार्गिकेच्या कामाकाजाचे विविध टप्प्यात आरेखन करण्यात येणार आहे. मेट्रोचे आरेखन आणि व्यवहार्यता तफावत निधीसाठी (गॅप फंडिंग) आवश्यक शासकीय जमिनी, मेट्रो सुरक्षा, मेट्रोला लागणारी जागा, स्थानके, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कास्टिंग यार्डसाठी बैठका, विकास आराखडय़ावर सुरु असलेले बदल यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मेट्रो आणि वर्तुळाकार रस्त्याचे काम सुरु झाल्यानंतर नागरिक, वाहतूकदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देण्याची दक्षता घेण्याबाबत पालकमंत्री बापट यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कविता द्विवेदी, प्रवीणकुमार देवरे, मिलिंद पाठक, उप जिल्हाधिकारी सुहास मापारी, महानगर नियोजनकार विवेक खरवडकर, विजयकुमार गोस्वामी, टाटा-सिमेन्स कंपनीचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची वैशिष्टय़े
ही मेट्रो उन्नत असून मार्गावर तेवीस स्थानके असतील. प्रकल्पासाठी आठ हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून पाच हजार कोटींची गुंतवणूक टाटा-सिमेन्स कंपनी करणार आहे. केंद्र, राज्य सरकार आणि पीएमआरडीएकडून वित्तीय तूट, जमिनीच्या स्वरूपातील भूसंपादन आणि पुनर्वसन यासाठी तीन हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत.