पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, तसेच खासगी अनुदानित शाळांच्या परीक्षा सुरू असताना शिक्षण विभागाने शाळांच्या ‘जिओ टॅगिंग’चे काम सुरू केले आहे. ‘जिओ टॅगिंग’साठी तयार केलेल्या ‘महास्कूल’ ॲपमध्ये माहिती भरण्याचा नवा ताप शिक्षकांना सहन करावा लागत असून, परीक्षा आणि मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करताना ‘जिओ टॅगिंग’चे काम शिक्षकांच्या माथी कशासाठी, असा सवाल शिक्षण क्षेत्रातून उपस्थित करण्यात येत आहे.
राज्यातील सर्व शाळांबाबतची माहिती केंद्र शासनाच्या ‘यूडायस प्लस’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यात शाळा, विद्यार्थिसंख्या, शिक्षकसंख्या, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, संगणकीय सुविधा यांबाबत माहितीचा समावेश आहे. या माहितीचा उपयोग आणि वापर शासनस्तरावर विविध धोरणे, कार्यक्रमांची आखणी, तसेच अंमलबजावणी आराखडा तयार करताना होतो. मात्र गाव, चावड्या, वस्ती यांचे ठिकाण, लोकसंख्येची घनता, तसेच उपलब्ध जिल्हा, राज्यमार्ग, महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, दोन शाळांमधील अंतर, शाळांच्या नजीक शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती शालेय शिक्षण विभागाकडे सद्यःस्थितीत उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यातील शाळांचे जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेळापत्रकानुसार, राज्यातील शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी सुरू आहे. याच काळात शालेय शिक्षण विभागाने शाळांच्या जिओ टॅगिंगचे काम सुरू केले आहे. त्यासाठीचे ‘महास्कूल’ ॲप शिक्षकांनी त्यांच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करून त्यावर शाळेची सर्व माहिती, छायाचित्रे भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा सुरू असताना हे कशासाठी, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
‘राज्यातील शाळांची माहिती शिक्षण विभागाकडे आधीच उपलब्ध आहे. तरीही पुन्हा तीच माहिती शिक्षकांना भरावी लागत आहे. परीक्षा सुरू असताना शिक्षकांना हे काम करायला लावणे योग्य नाही. त्यासाठी वेळही दिला जात नाही. माहिती भरण्यासाठी शिक्षकांनी शनिवार-रविवारचा वेळ घालवूनही हे काम पूर्ण झालेले नाही. एकीकृत पद्धतीने माहिती संकलित करण्याबाबत वारंवार चर्चा होऊनही तीच तीच माहिती पुन्हा पुन्हा भरायला लावणे चुकीचे आहे. त्यात शिक्षकांचा नाहक वेळ जातो,’ अशी प्रतिक्रिया माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी व्यक्त केली.
शाळांची उन्हाळी सुटी सुरू होण्यापूर्वी ‘जिओ टॅगिंग’चे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. शिक्षकांना शाळेतील छायाचित्रे, अक्षांश रेखांश अशा प्रकारची माहिती ॲपमध्ये भरायची आहे. हे काम एकदाच करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षक त्यांच्या वेळेनुसार ते काम करू शकतात. शाळांचे जिओ टॅगिंग केल्यामुळे उपलब्ध होणारी नेमकी माहिती येत्या काळात वेगवेगळ्या स्तरांवर उपयुक्त ठरणार आहे.- सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त