पुणे : हिमालयातील जोशीमठ हे ठिकाण पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. या ठिकाणच्या नैसर्गिक मर्यादांवर झालेल्या मानवी अतिक्रमणामुळे शहर खचण्याचा प्रकार होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी मांडले असून, राज्यात पाचगणीसारख्या ठिकाणांची रचनाही जोशीमठाप्रमाणेच असल्याचे वास्तव तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे, या भागातही जागरूक राहण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिमालयात दरडी कोसळून स्थिर झाल्यानंतर तयार झालेली ठिकाणे आहेत. जोशीमठ त्यापैकीच एक आहे. कोसळलेल्या दरडीच्या खाली खडक असल्यास पाया चांगला असतो. मात्र, जोशीमठमध्ये अशी परिस्थिती नाही. तेथील सांडपाण्याची व्यवस्था चांगली नाही. त्याशिवाय चारधाम यात्रेसाठी रस्ता करणे, ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पासाठी बोगदा तयार करणे, बांधकामांचे बेसुमार अतिक्रमण याचा फटका जोशीमठला बसला आहे. जोशीमठ शहराच्या खाली असलेला पाया ठिसूळ होऊन शहर खचत असल्याचे दिसते. गेल्या काही वर्षांत या ठिकाणी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढल्याचा ताणही निर्माण झाला आहे. विकासकामे करताना मिश्रा समितीच्या अहवालातील शिफारशींचे पालन झाले नाही. त्यामुळे, जोशीमठ शहर खचण्यामागे नैसर्गिक कारणांसह मानवी हस्तक्षेप हेही महत्त्वाचे कारण असल्याचे ज्येष्ठ भूशास्त्रज्ञ आणि हिमालयाचे अभ्यासक डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

काळाची गरज म्हणून काही विकासकामे करणे आवश्यक आहे. मात्र, विकासकामे करताना काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. गावे स्थलांतरित करणे हा उपाय होऊ शकत नाही. शाश्वत विकास डोळ्यासमोर ठेवूनच काम करण्याची गरज असल्याचेही डॉ. करमळकर यांनी नमूद केले.

पाचगणीची स्थिती काय?

जोशीमठप्रमाणेच राज्यात पाचगणीसारख्या ठिकाणची रचना बरीच समान आहे. जमिनाचा आतला ठिसूळ भाग मोठा पाऊस झाल्यास किंवा सांडपाण्यानेही वाहून जातो. २००५ मध्ये अतिपावसामुळे भिलारमध्ये दरड कोसळली होती. त्यावेळी शासनाने नेमलेल्या समितीमध्ये काम करून अहवाल सादर केला. त्यानंतर काही गावांचे स्थलांतर करण्यात आले. पाचगणीचा भाग कोयनेच्या खोऱ्यात येतो. गेल्या काही वर्षांत पाचगणीमध्येही पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. त्यामुळे, जोशीमठची परिस्थिती पाहता पाचगणी परिसराबाबतही जागरूक राहण्याची गरज आहे, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geographical similarity between joshimath and panchgani pune print news ccp 14 ssb