पुणे : मार्केट यार्डातील फळबाजारात सव्वा किलो वजनाच्या ‘जाॅर्ज मॅंगो’चे आगमन झाले आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातून या आंब्यांची आवक सुरू झाली असून, हे आंबे पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी होऊ लागली आहे. मार्केट यार्डातील व्यापारी संदीप कटके यांच्या किरण फ्रुट एजन्सी गाळ्यावर वेल्हे तालुक्यातील शेतकरी श्रीराम सरपाले यांनी प्लास्टिक जाळ्यांमधून सव्वा किलो वजनाचे आंबे विक्रीस पाठविले.
सरपाले यांनी विक्रीस पाठविलेला आंबा आकाराने मोठा आहे. त्याचे वजन साधारणपणे सव्वा किलो आहे. सव्वा किलो वजनाच्या आंब्यांची आवक बाजारात झाल्यानंतर आंबा पाहण्यासाठी अडते आणि ग्राहकांनी गर्दी केली, असे आंबा व्यापारी संदीप कटके यांनी सांगितले. आंबा आकाराने मोठा असून प्रतिकिलो आंब्याला ५० रुपये किलो भाव मिळाला आहे. वेल्हे तालुक्यातील सोडे सरपाले गावातील शेतकरी श्रीराम सरपाले यांनी मोठ्या आकारांच्या आंब्यांची लागवड केली आहे. या आंब्यांना ‘जाॅर्ज मॅंगो’ असे नाव देण्यात आले आहे, असे कटके यांनी नमूद केले.