जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला त्या दिवशी मी औरंगाबादमध्ये एका लग्नसमारंभात मित्रासोबत होतो, असा दावा या बॉम्बस्फोट प्रकरणात पकडण्यात आलेला आरोपी मिर्झा हिमायत बेग याने गुरुवारी न्यायालयात दिलेल्या जबाबत केला आहे. श्रीलंकेत गेलो असल्याचे त्याने सांगितले असले, तरी कपडे व अत्तराचा व्यवसाय करण्यासाठी आपण तेथे गेलो असल्याचे त्याने म्हटले आहे.
केंद्राने बंदी घातलेल्या इंडियन मुजाहिद्दीन, लष्कर- ए- तोयबा, सिमी या संघटनांशी कोणताही संबंध नाही. त्याचबरोबर या संघटनेचे फरार आरोपी रियाज भटकळ, इक्बाल भटकळ, यासीन भटकळ, मोहसीन चौधरी, फय्याज कागझी यांना मी ओळखत नसल्याचेही बेग म्हणाला. जबाबात तो म्हणाला की, पुण्यात डी.एड्.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी पुना कॉलेजमध्ये बीएच्या दुसऱ्या वर्षांत प्रवेश घेतला. २००८ मध्ये नोकरीच्या शोधासाठी औरंगाबाद, लातूर व उदगीर येथे फिरलो. नोकरी न मिळाल्याने व्यवसाय करण्याचे ठरविले. मुंबई येथून ४० ते ५० हजार रुपयांचे रेडिमेड कपडे व २० हजार रुपयांचे अत्तर खरेदी करून मी ते कोलंबोत विक्रीसाठी गेलो होतो. त्याठिकाणी अपेक्षित नफा मिळत नसल्याने पुन्हा भारतात परतलो.
उदगीर येथे माझे कोणतेही इंटरनेट कॅफे किंवा घर नाही. दहशतवादी विरोधी पथकाने कोणत्याही प्रकारची स्फोटके माझ्या घरातून जप्त केलेली नाहीत. स्फोटाच्या दिवशी एका लग्नसोहळ्यात मी औरंगाबादमध्ये होते. औरंगाबादला मी कोणाकडेही माझा फोन ठेवण्यासाठी दिला नव्हता. मी कधीही बनावट कागदपत्रे तयार केली नाही. पोलिसांनी माझ्याकडून कोणताही बनावट दस्तावेज जप्त केला नाही. एटीएसने मला पकडल्यानंतर सुरुवातीला पुणे व नंतर मुंबईला नेले. त्या ठिकाणी माझा छळ करण्यात आल्याची तक्रारही त्याने जबाबात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा