पुणे : जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्याला महाराष्ट्रातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना राज्य शासनातर्फे मोफत जर्मन भाषा शिकवली जाणार आहे. मात्र, युवकांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात पाच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बाळकृष्ण वाटेकर यांनी ही माहिती दिली. युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमरता असल्याने राज्यातील कुशल युवकांना युरोपीय देशांमध्ये नोकरी, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्याशी फेब्रुवारीमध्ये करार केला आहे. त्या अंतर्गत बाडेन वुटेनबर्ग या राज्याला कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुण्यातील गोएथे इन्स्टिट्यूट मॅक्समुलर भवन आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. पथदर्शी तत्त्वावर सुरुवातीला विविध क्षेत्रातील किमान १० हजार कुशल मनुष्यबळ बाडेन वुटेनबर्ग या राज्यास उपलब्ध करून देण्यासाठी एकूण तीस क्षेत्रांची निश्चिती करण्यात आली आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण झालेले विद्यार्थी https://www.maa.ac.in/GermanyEmployment/ या दुव्यावर नोंदणी करू शकतात. नोंदणी करून पात्र ठरलेल्या उमेदवारांना राज्य शासनाकडून मोफत जर्मन भाषेचे शिक्षण दिले जाणार आहे. त्या दृष्टीने पुणे, पिंपरी चिंचवड येथे पाच प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असे वाटेकर यांनी सांगितले. एखाद्या अभ्यासक्रमाबाबत बाडेन-वुटेनबर्ग राज्याचा अभ्यासक्रम आणि महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात तफावत असल्यास ती दूर करण्यासाठी, गरजेनुसार क्षेत्रनिहाय कौशल्यवृद्धीसाठी युवकांना शासनाकडून मोफत कौशल्यवृद्धीचे अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यास मुदतवाढ…
जर्मन शिकवणाऱ्या शिक्षकांना संधी…
नोंदणी केलेल्या युवकांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची गरज भासणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील जर्मन भाषा शिकवण्याची आवड असणाऱ्या शिक्षकांनी https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHc7 या दुव्यावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.