पुणे : ज्येष्ठ जर्मन भाषातज्ज्ञ प्रा. डॉ. प्रमोद तलगेरी (वय ८०) यांचे गुरुवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. जर्मन भाषेतील अद्वितीय कामगिरीसाठी २००५ मध्ये जर्मन सरकारतर्फे त्यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी’ या सर्वोच्च किताबाने सन्मानित करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारवार येथे १९४२ मध्ये जन्म झालेल्या प्रमोद तलगेरी यांनी पुण्यातून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जर्मन भाषेत त्यांनी प्रभुत्व संपादन केले. हैदराबाद येथील सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लँग्वेजेस (ईएफएलयू) या अभिमत विद्यापीठाचे त्यांनी कुलगुरुपद भूषविले होते. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर ऑफ जर्मन स्टडीजचे प्रमुख आणि स्कूल ऑफ लँग्वेजेसचे ते अधिष्ठाता होते.

पुण्यातील इंडिया इंटरनॅशनल मल्टियुनिव्हर्सिटीच्या कुलगुरुपदाची धुरा त्यांनी सांभाळली होती.  मॅनेजमेंट ऑफ इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एमआयआयआयटी)चे ते सल्लागार होते. विविध विद्यापीठांच्या मानद पदव्या त्यांनी संपादन केल्या होत्या. म्युनिच विद्यापीठामध्ये ‘हेगेल एस्थेटिक’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएच.डी. संपादन केली होती. दिल्ली येथे १९७९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई आणि जीडीआरचे अध्यक्ष एरीच होनेकर यांच्यातील बैठकीमध्ये प्रा. तलगेरी यांनी मुख्य दुभाषी म्हणून काम पाहिले होते. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.

जर्मन भाषेत पुस्तके प्रसिद्ध..

जर्मन स्पिकिंग विद्यापीठामध्ये व्याख्याता म्हणून आमंत्रित करण्यात आलेले डॉ. प्रमोद हे भारतातील पहिले जर्मनविभूषित होते. जर्मन भाषेत त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. देशाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत साहित्य अकादमीच्या वतीने त्यांनी ‘ट्रान्स्लेटिंग इंडिया’ हा अनुवादाचा उपक्रम राबविला होता. जुना ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना हैदराबाद येथील इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अ‍ॅण्ड कल्चरल संस्थेतर्फे २००० मध्ये हेरिटेज अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.