राज्यात ८६ हजार शेतकऱ्यांकडे सौरपंप कार्यान्वित
पुणे : पारंपरिक पद्धतीने कृषिपंपांची जोडणी न झालेल्या किंवा दुर्गम भागात असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देत सध्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला गती देण्यात आली आहे. राज्यातील सुमारे ८६ हजार शेतात सौरपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतीला दिवसा आणि विनाअडथळा सौरपंपाद्वारे पाणी उपलब्ध होत असून, वीज देयकातूनही या शेतकऱ्यांची सुटका झाली आहे.
सौर कृषिपंपाद्वारे वीजजोड देण्याच्या योजनेमध्ये पंपाच्या आधारभूत किमतीपैकी लाभार्थी शेतकऱ्याला सर्वसाधारण गटात १० टक्के, तर अनुसूचित जाती-जमाती गटात ५ टक्के हिस्सा आहे.आस्थापित करण्यात आलेल्या सौर कृषिपंपासाठी ५ वर्ष आणि पॅनेलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखभालीचा खर्चही शून्य आहे. योजनेअंतर्गत एक लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातून आतापर्यंत २ लाख ४० हजार ६१७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ९७ हजार ९ लाभार्थींनी मागणी पत्रांचा (डिमांड नोट) भरणा केला आहे, तर ९६ हजार १९१ लाभार्थींनी स्वत: निवडसूचीतील संबंधित पुरवठादारांची निवड केली आहे. या योजनेची सर्व माहिती महावितरणच्या https://www.mahadiscom.in/solar/ या स्वतंत्र पोर्टलवर उपलब्ध आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नवीन वीजजोडण्यांसाठी स्वतंत्र कृषिपंप वीजजोडणी धोरणाला वेग दिला आहे.
औरंगाबाद विभागात सर्वाधिक सौरपंप
राज्य शासनाच्या सौर कृषिपंप योजनेमध्ये महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागात सर्वाधिक ४६ हजार ७०० सौरपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ नागपूर प्रादेशिक विभागात २० हजार १९९, कोकण प्रादेशिक विभागात १३ हजार ९१, तर पुणे प्रादेशिक विभागात ५ हजार ९७३ सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत.