अविनाश कवठेकर, लोकसत्ता
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यात येणार असून, पुणे लोकसभा मतदारसंघावर मनसेने लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यादृष्टीने विधानसभानिहाय आढावा घेताना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांनी ‘कार्यशाळा’ घेत पदाधिकाऱ्यांना सूचना केली. राजकारणापलीकडे जाऊन समाजात मिसळून कामे करा, निवडणुकीच्या तयारीला लागा, अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली. मात्र, या कार्यशाळेसंदर्भात कोणीही जाहीर वाच्यता करू नये, अशी तंबीही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.
आगामी लोकसभा निवडणूक पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. मनसेकडूनही निवडणूक लढविण्यात येणार असून, पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यासाठी समन्वयक यांची पुणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा आणि आढावा बैठक घेतली होती. त्यानुसार पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. धनंजय खाडिलकर यांनी निवडणूक यंत्रणा उभारणीसंदर्भात मार्गदर्शन केले. पक्षीय निवडणूक यंत्रणा सक्षम करण्याची सूचना राज ठाकरे यांनी या कार्यशाळेत केली.
आणखी वाचा-पुणे-दौंड रेल्वे प्रवास स्वस्तात! मार्गावर लोकल सेवा सुरु होणार
दरम्यान, राज्यातील राजकारणाचा पूर्ण विचका झाला आहे. सर्वच पक्ष त्याला जबाबदार आहेत. जनतेचे प्रश्न गंभीर झाले असून, त्याला कोणी वाली राहिलेला नाही. त्यामुळे जनतेला आधार वाटेल, असे काम मनसे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी करावे, अशी सूचना राज ठाकरे यांनी केली. दरम्यान, या कार्यशाळेतील विषयांबाबत मनसे पदाधिकाऱ्यांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. कार्यशाळेतील चर्चेची कोणीही जाहीर वाच्यता करू नये, अशी तंबीही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.
महिला शहर अध्यक्ष वनिता वागसकर, सुशीला नटके, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, सरचिटणीस किशोर शिंदे, बाबू वासगकर, पक्षाचे नेते अनिल शिदोरे, प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, अजय शिंदे, वसंत मोरे, गणेश सातपुते, रणजित शिरोळे, योगेश खैरे यावेळी उपस्थित होते. दरम्यान, निवडणूक लढविण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यानुसार निवडणूक लढविण्यात येईल. मात्र, संभाव्य उमेदवाराबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.