रवींद्र केसकर
धाराशिव : हलगीचा कडकडाट, संबळाचा निनाद आणि आई राजा उदो-उदोच्या जयघोषात महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मोठ्या भक्तीमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली. तुळजाभवानी देवीच्या सिंहगाभार्यात मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे दाम्पत्याच्या हस्ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पारंपारिक पध्दतीने घटस्थापना करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपुष्टात आली. त्यानंतर भोपे पुजार्यांनी तुळजाभवानी देवीची मूर्ती देवीच्या मंचकावरून सिंहासनावर पुर्ववत विराजमान केली. देवीच्या चांदी सिंहासनाला झळाळी दिल्यामुळे ते अधिक फुलून दिसत होते. पारंपारिक धार्मिक विधीनंतर विशेष पंचामृत अभिषेक पूजा करण्यात आली. अभिषेकानंतर सर्वसामान्य भाविकांना तुळजाभवानी देवीचे दर्शन खुले करण्यात आले. सकाळी ठिक ६ वाजेच्या सुमारास पुन्हा अभिषेक घाट नित्योपचार पंचामृत अभिषेक करण्यात आले.
आणखी वाचा-कोल्हापुरात आजपासून नवरात्रीचे मांगल्य पर्व; करवीरनिवासिनी महालक्ष्मीची रोज नवनवीन रूपे
मंदिरातील गोमुख तीर्थ या ठिकाणी घटकलशांची पारंपारिक पध्दतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर या घटकलशांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी महंत व भोपे पुजार्यांनी तुळजाभवानी देवीला नैवेद्य दाखवून धुपारती व अंगारा विधी पूर्ण केले होते. घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी देवीची विशेष अलंकार पूजाही बांधण्यात आली. गोमुख तीर्थाजवळून सुरू झालेली घटकलश मिरवणूक सिंहगाभार्यात दाखल झाली. घटकलश वावरीत ठेवून पारंपारिक पध्दतीने त्याचे पूजन करण्यात आले आणि घटस्थापना करण्यात आली.
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात नवरात्रौत्सव कालावधीत विविध धार्मिक विधी केले जातात. त्यासाठी उपस्थित ब्रम्हवृंदांना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे दाम्पत्याच्या हस्ते वर्णी देण्यात आली. मंदिरातील उपदेवता असलेल्या खंडोबा मंदिर, यमाई देवी मंदिर, टोळभैरव आणि आदीमाया आदिशक्ती या मंदिरामध्येही जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, अर्चना पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विश्वस्त उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा यांच्यासह तिन्ही पुजारी मंडळांचे पदाधिकारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.