गेली अनेक वर्षे रखडलेल्या घोरपडीतील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न येत्या तीन ते चार महिन्यांत सोडवण्याचे आश्वासन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खासदार शिवाजीराव आढळराव यांना दिल्ली येथे झालेल्या बैठकीत दिले. लोकसभा पावसाळी अधिवेशनादरम्यान या विषयासाठी सर्व संबंधितांची बैठक बोलावली जाईल, असेही र्पीकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचा रखडलेला प्रश्न सुटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
खासदार आढळराव आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीत पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे घोरपडी उड्डाणपुलाचा प्रश्न सोडवण्याबाबत निवेदन देऊन चर्चा केली. घोरपडी भागातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी घोरपडी आणि लुल्लानगर येथे उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. तसे नियोजनही महापालिकेने केले आहे. या पुलासाठी संरक्षण विभागाच्या काही जागांची आवश्यकता आहे. त्या अद्याप मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पुलांचे नियोजन असले, तरी पुलांच्या जागांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या पुलांसाठी लोकसभेच्या समितीकडेही दाद मागितली होती, असे खासदार आढळराव यांनी या वेळी सांगितले.
घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाच्या प्रश्नाबाबत संरक्षणमंत्री र्पीकर यांनी या भागात पाहणी दौराही केला होता. त्या वेळी या दोन्ही पुलांची कामे होण्याच्या दृष्टीने र्पीकर यांनी सकारात्मक भूमिका घेऊन अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार पुणे महापालिकेने उड्डाणपुलाचा सुधारित प्रस्तावही संरक्षण विभागाला सादर केला आहे. या सर्व बाबी खासदार आढळराव यांनी पर्रीकर यांना सांगितल्या. या दोन्ही पुलांचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांचा मी सखोल अभ्यास केला आहे. येत्या तीन-चार महिन्यांत या पुलांचा प्रश्न सोडवला जाईल, असे पर्रीकर यांनी या वेळी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा