शिवसेनेच्या विरोधानंतर पाकिस्तानी गझलगायक उस्ताद गुलाम अली यांचा पुण्यातील कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. येत्या शनिवारी पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्र येथे हा कार्यक्रम होणार होता. मात्र, शिवसेनेने मुंबईसोबतच पुण्यातील कार्यक्रमालाही विरोध केला होता.
‘एक एहसास-चौदवीं की रात’ असे या कार्यक्रमाचे नाव होते. मुंबईमध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये शुक्रवारी हा कार्यक्रम होणार होता. मात्र, शिवसेनेने त्याला विरोध दर्शविल्यानंतर आयोजकांनी बुधवारी संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या मुद्द्यांशी सहमती दर्शवत आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली. मुंबईतील कार्यक्रम रद्द झाल्यामुळे पुण्यातीलही कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. आयोजक रणधीर रंजन रॉय म्हणाले, पुण्यातील कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णयही कालच घेण्यात आला होता. मुंबईसोबतच हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या विरोधानंतर आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये हा कार्यक्रम घेण्याचे निमंत्रण दिले आहे.

Story img Loader