अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने साहित्य संमेलन घुमान येथे घेण्यास हरकत नसल्याचे मराठी प्रकाशक परिषदेने गुरुवारी स्पष्ट केले. मात्र, मराठी भाषकांची संख्या अधिक असलेल्या भागातच मुख्य संमेलन घेण्यात यावे, अशी मागणी परिषदेतर्फे करण्यात आली.
परिषदेतर्फे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कार्याध्यक्ष अरुण जाखडे यांनी ही माहिती दिली. परिषदेचे अध्यक्ष रमेश कुंदूर, कोशाध्यक्ष अरिवद पाटकर, कार्यवाह अनिल कुलकर्णी आणि सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होत्या. प्रकाशकांच्या मागण्यांसदर्भात १४ सप्टेंबपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन माधवी वैद्य यांनी दिले असल्याचे जाखडे यांनी सांगितले.
साहित्य संमेलन कोठे घ्यायचे याचा अधिकार साहित्य महामंडळाला आहे. मात्र, ज्या भागात मराठी भाषक रसिकांचे प्रमाण अधिक आहे अशा ठिकाणी मुख्य संमेलन झाले पाहिजे. संत नामदेव आणि शीख समाजाबाबत आम्हाला आदर आहे. त्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही, असे सांगून जाखडे म्हणाले, ग्रंथप्रदर्शन हा साहित्य संमेलनाचा अविभाज्य भाग आहे. परंतु, खेडेगाव असलेल्या घुमान येथे मराठी भाषकांची वस्ती नाही. तेथे ग्रंथालय नाही. वाङ्मयीन उपक्रमही होत नाहीत. त्याचप्रमाणे साहित्य परिषदेची शाखाही नाही. त्यामुळे तेथे मुख्य संमेलन झाल्यास ग्रंथव्यवहाराला प्रतिसाद मिळणार नाही. घुमान येथे विभागीय किंवा छोटेखानी संमेलन झाल्यास त्यामध्ये आम्ही सहभागी होऊ. पण, मुख्य संमेलन मराठी भाषकांचे प्राबल्य असलेल्या ठिकाणीच व्हावे.
प्रकाशन व्यवसाय हा काही संमेलनातील तीन दिवसांच्या ग्रंथविक्रीवर अवलंबून नाही. वर्षभर आमचा व्यवसाय सुरू असतो. परंतु, वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथप्रदर्शनाची मदत होते. महामंडळाकडून प्रकाशकांची हेटाळणी केली जाते. त्यामुळे महामंडळाने प्रकाशकांच्या योगदानाचाही सन्मान केला पाहिजे, अशी मागणी जाखडे यांनी केली.
यापूर्वी राज्याबाहेर संमेलने झाली आहेत. मात्र, तेथे मराठी भाषकांची वस्ती असल्याने आम्ही विरोध केला नव्हता. पण, साहित्येतर क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे निमंत्रण स्वीकारून घुमानची निवड कोणत्या निकषांच्या आधारे केली हे साहित्य महामंडळाने स्पष्ट करावे आणि या संमेलनाद्वारे चुकीचा पायंडा पडू नये, अशी मागणी अरिवद पाटकर यांनी केली.