आपल्या महाराष्ट्रात अजून सुपीक जमीन आहे. तर, बरीच जमीन नांगरायची बाकी आहे. विदर्भ, मराठवाडा संमेलनासाठी आसुसलेले आहेत. संत नामदेवांचे कार्य पंजाबमध्ये असले तरी ते मूळचे महाराष्ट्राचे आहेत. नामदेवांचे स्मरण महाराष्ट्रात करता येते. मग, घुमानला जाऊन काय करणार, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी शुक्रवारी केला.
शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची करावी, अशी शिफारस भाषा सल्लागार समितीने राज्य सरकारला केली आहे. या संदर्भात भाष्य करताना कर्णिक म्हणाले, भाषेची सक्ती करू नये असे मला वाटते. मुंबईवगळता महाराष्ट्रात मराठी भाषेची स्थिती उत्तम आहे. मुंबईमध्ये मराठी शाळांमधील मुलांचा टक्का घसरतो आहे हे वास्तव असले, तरी त्यामागची कारणे ही जागतिक आणि आर्थिक स्वरूपाची आहेत. मराठी शाळा बंद पडण्यामागे सांस्कृतिक आणि भाषिक स्वरूपाची कारणे नक्कीच नाहीत.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्यामध्ये शाखा सुरू करण्यावरून होत असलेल्या वादासंदर्भात विचारले असता या वादामध्ये मला ओढू नका, असे कर्णिक यांनी स्पष्ट केले. आमची माणसे त्यासाठी भांडत आहेत. पण, कोकणचेही वेगळे अस्तित्व आहे. त्या प्रांताचेही काही प्रश्न आहेत. त्यासाठी ‘कोमसाप’ला स्वतंत्रपणे काम करू देण्यामध्येच सभ्यता आहे, असेही मधू मंगेश कर्णिक यांनी सांगितले.
घुमानला जाऊन काय करणार? – मधू मंगेश कर्णिक
संत नामदेवांचे कार्य पंजाबमध्ये असले तरी ते मूळचे महाराष्ट्राचे आहेत. नामदेवांचे स्मरण महाराष्ट्रात करता येते. मग, घुमानला जाऊन काय करणार.
First published on: 22-11-2014 at 03:12 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghuman madhu mangesh karnik sammelan