घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक कामत आणि ज्येष्ठ कथाकार भारत सासणे हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कामत आणि सासणे यांचे नाव सुचविणारे अर्ज गुरुवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दाखल झाले. डॉ. सदानंद मोरे यांचे नाव सुचविणारा अर्ज यापूर्वीच दाखल झाला असल्याने अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंगेश कश्यप यांनी डॉ. अशोक कामत यांचे नाव सुचविले असून या अर्जावर प्रदीप निफाडकर, डॉ. श्यामा घोणसे, केतकी मोडक, डॉ. प्रतिमा इंगोले आणि दीपक करंदीकर यांनी अनुमोदक म्हणून सही केली आहे. डॉ. वीणा देव यांनी अध्यक्षपदासाठी भारत सासणे यांच्या उमेदवारीचे सूचक म्हणून सही केली आहे. तर, विद्या बाळ, संजय भास्कर जोशी, महावीर जोंधळे, डॉ. विलास खोले आणि मुकुंद अनगळ यांनी अनुमोदन दिले आहे. सासणे यांचे नाव सुचविणारा अर्ज यापूर्वी मुंबई मराठी साहित्य संघामध्येही दाखल झाला आहे. परिषदेचे पदाधिकारी घुमान संमेलनाचे कार्यक्रम निश्चित करण्यासाठी अमृतसर येथे गेले आहेत. त्यामुळे कार्यवाह महेंद्र मुंजाळ यांनी हे दोन्ही अर्ज स्वीकारून निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांच्याकडे सुपूर्द केले.
साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार घटक संस्थेकडे दाखल झालेल्या अर्जापैकी केवळ तीन नावे अध्यक्षपदासाठी महामंडळाला सुचविता येतात. त्यामुळे आणखी एखादा अर्ज दाखल झाल्यास आपली उमेदवारी कायम राहावी यासाठी उमेदवारांकडून महामंडळाच्या अन्य घटक संस्थांकडे अर्ज करण्याचा मार्ग स्वीकारला जातो. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे तीन नावे सुचविण्यात आली आहेत. अध्यक्षपदासाठी नावे सुचविण्याची २३ सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा