राज्यात चार प्रमुख पक्षांमध्ये निवडणूक होत असताना साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी उभे असलेल्या उमेदवारांच्या साक्षीने मतपेटी गुरुवारी सीलबंद करण्यात आली. हे होत असतानाच आपली मतपत्रिका घेऊन पहिला मतदार आला आणि उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता पाहता आली.
राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. १ हजार ७० मतदारांना साहित्य महामंडळाने दोन दिवसांपूर्वी मतपत्रिका रवाना केल्या. ज्येष्ठ कथाकार भारत सासणे, संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आणि डॉ. अशोक कामत यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी मतपेटी सीलबंद केली. या निवडणुकीतील एक उमेदवार पुरुषोत्तम नागपुरे यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी म्हणून अमित कुलकर्णी उपस्थित होते. आडकर यांनी सर्व उमेदवारांना मतपत्रिकांसंदर्भातील माहिती दिली. मतपेटी सीलबंद होत असतानाच प्रतीक पुरी हा पहिला मतदार आपली मतपत्रिका घेऊन आला. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेची प्रचिती उमेदवारांना आली. विधानसभा निवडणुकीचा निकाल दिवाळीपूर्वी लागणार असला, तरी नूतन संमेलनाध्यक्ष मात्र १० डिसेंबरला निश्चित होणार आहेत.
ठीक अकरा वाजता उपस्थित झालेले डॉ. सदानंद मोरे आणि डॉ. अशोक कामत हे चर्चा करीत होते. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी त्यांना कार्यालयात निमंत्रित केले. ‘आम्हाला वाटले तुम्ही कामात असाल’ असे डॉ. अशोक कामत प्रवेश करताना म्हणाले. ‘कामात असल्या तरी कामत आल्यावर काम बाजूला’ अशी कोटी संजय भास्कर जोशी यांनी केली.

Story img Loader