पंजाब येथील घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नामदेवांचे तेथील कार्य माहिती करून घेण्यासाठी विविध राज्यातून नामदेव समाजाचे ६५० ते ७०० बांधव घुमानला जाणार आहेत. राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, इंदोर, जबलपूर, कुरूक्षेत्र या ठिकाणाहून संत नामदेवांचे अनुयायी येणार आहेत.
‘शिंपी इम्पॅक्ट ऑर्गनायझेशन’चे (सिओ) राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव मांढरे यांनी ही माहिती दिली. ही संस्था १८ राज्यांत कार्यरत आहे. नामदेव समाजाच्या ६५ पोटजाती असून त्या देशभर विखुरलेल्या आहेत. महाराष्ट्रातील जळगाव-धुळ्याचे अहिर शिंपी, महाराष्ट्र, कर्नाटक आणि सोलापूर-पंढरपूर येथील सीमाभागातील नामदेव समाज, राजस्थानचा छिप्पा समाज, दिल्लीचा रोहिला समाज, कुरूक्षेत्रचा टाँक आणि क्षत्रिय समाज, हैद्राबादचा तेलुगु शिंपी समाज, नागपूर-चंद्रपूरचे मेरु शिंपी, मध्य प्रदेशचा नामदेव समाज, गुजरातचा जर्दी समाज आदींचा यात समावेश आहे.
मांढरे म्हणाले, ‘‘पंढरपूर सर्वाना माहीत असले, तरी घुमानची मात्र बऱ्याच जणांना माहिती नाही. घुमानचे साहित्य संमेलन केवळ संतसाहित्य या एकाच विषयावर नसले, तरी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नामदेवांचे तेथील कार्य माहिती करून घेता यावे आणि या समाजांची एकमेकांशी भेट व्हावी असा उद्देश आहे. नामदेव समाज मोठा असला तरी विखुरलेला असल्याने कोण कुठे राहते हे माहिती नसते. त्यामुळे एकमेकांची ओळख होणेही गरजेचे आहे. शीख समाजही संत नामदेवांचा भक्त आहे. हे सर्व पाहता या निमित्ताने बघता येईल.’’
घुमानला जाण्याची व्यवस्थाही संस्थेचे लोक स्वत:च करणार आहेत. दिल्ली, हरिद्वार, कुरूक्षेत्र अशा ठिकाणी नामदेव समाज भवन आहे. तिथे राहून लोक जाऊन-येऊन घुमानच्या साहित्य संमेलनात उपस्थित राहतील. काही लोक आगगाडीने तर काही बसने गट करुन जाणार आहेत. दिल्लीत लोधी रस्त्याला संत नामदेवांचे मोठे मंदिर आहे. तिथे समाजाचे सर्व लोक एकत्र येणार आहेत, असेही मांढरे यांनी सांगितले.
पुण्यात ७ व ८ मार्चला ‘नामदेव महाराज साहित्य संमेलन’
‘सिओ’ या संस्थेतर्फे ७ व ८ मार्चला उद्यान प्रसाद कार्यालयात नामदेव महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचेही मांढरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ज्येष्ठ लेखक डॉ. ज्ञानेश्वर तांदळे या संमेलनाचे अध्यक्ष असतील. संत नामदेवांच्या साहित्यातील विविध पैलू या साहित्य संमेलनात चर्चिले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा