मागण्या मान्य होऊनही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होऊ न शकल्याने प्रकाशकांसाठी राज्यामध्ये ग्रंथप्रदर्शन केव्हा होणार हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. मात्र, साहित्य महामंडळाचे पदाधिकारी पंजाबला रवाना झाले असून आधी लगीन घुमान साहित्य संमेलनाचे होणार हे स्पष्ट झाले आहे.
घुमान येथे साहित्य संमेलनाची घोषणा झाल्यानंतर मराठी प्रकाशक परिषदेने नाराजीचा सूर व्यक्त केला होता. यासंदर्भात निवेदन दिल्यानंतरही साहित्य महामंडळाने कोणतीही दखल न घेतल्याने अखेर प्रकाशक परिषदेला संमेलनावर बहिष्कार टाकण्याचे पाऊल उचलावे लागले होते. अखेर महामंडळ पदाधिकाऱ्यांनी प्रकाशकांसमवेत बैठक घेतली. मराठी माणसांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणची संमेलनासाठी निवड करावी, संमेलनातील ग्रंथप्रदर्शनाच्या नियोजनासाठी प्रकाशक आणि विक्रेत्यांचा सहभाग असलेली स्वतंत्र समिती नियुक्त करावी, प्रकाशकांकडून घेतल्या जाणाऱ्या शुल्कातून महिलांसाठी स्वच्छतागृह, पाणी आणि सुरक्षा या सुविधा द्याव्यात, या मागण्यांचा प्रकाशक परिषदेने दिलेल्या निवेदनात समावेश होता.
हैदराबाद येथे झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये हे पत्र चर्चेसाठी ठेवण्यात आले. त्यामध्ये प्रकाशक परिषदेने केलेल्या सर्व मागण्यांना संमती देण्यात आली. त्याबाबतचे पत्र महामंडळाने प्रकाशक परिषदेला दिले आहे. मात्र, त्यानंतरच्या कालावधीत महामंडळाचे पदाधिकारी आणि प्रकाशक परिषदेचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक होऊ शकली नाही. महामंडळ पदाधिकाऱ्यांची घुमान संमेलनाच्या तयारीची लगबग सुरू झाली. त्यामुळे प्रकाशकांसाठी राज्यामध्ये ग्रंथप्रदर्शन केव्हा घ्यायचे हे अद्यापही निश्चित होऊ शकलेले नाही. अर्थात सर्व मराठी वाचकप्रेमींसाठी हे प्रदर्शन कोठे घ्यायचे आणि त्याच्या खर्चाचा भार कोणी उचलायचा या बाबी दोन्ही संस्थांच्या एकत्रित बैठकीनंतरच स्पष्ट होणार असल्या तरी आधी लगीन घुमान साहित्य संमेलनाचे होणार हे निश्चित झाले आहे.

प्रमुख प्रकाशकांची पाठ
घुमान संमेलनातील ग्रंथप्रदर्शनामध्ये काही मोजके अपवाद वगळता राज्यातील प्रमुख प्रकाशकांची पुस्तक विक्री केंद्रे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदर्शनामध्ये ग्रंथविक्रीसाठी ३० दालने ठेवण्यात आली असली तरी पुस्तकविक्रीला फारसा प्रतिसाद मिळणार नसल्याने पुणे आणि मुंबईतील मान्यवर प्रकाशकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. संमेलनामध्ये चार दालने ही राज्य सरकारच्या प्रकाशनाची असून साहित्य महामंडळ, महामंडळाच्या घटक संस्थांसाठी दालने आहेत. लिमये विश्व प्रकाशन, नार्वेकर एजन्सी, महानुभाव साहित्य प्रकाशन, ज्ञानप्रबोधिनी, शतायुषी, अक्षर मानव प्रकाशन, मैत्रेय प्रकाशन आणि चपराक प्रकाशन या संस्थांची पुस्तके वाचकांना उपलब्ध होणार असल्याची माहिती संमेलनाच्या संयोजन समितीने दिली.  

Story img Loader