आषाढी वारीतील भक्तिभावाची जपणूक करीत राज्यातील विविध भागांतून पंजाबातील घुमान या क्षेत्री ‘नामा’चा गजर करीत दिंडय़ा साहित्य संमेलनात पोहोचणार आहेत. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वाढता पाठिंबा मिळत असल्याची बाब याद्वारे अधोरेखित होत आहे.
घुमान येथे ३ ते ५ एप्रिल या कालावधीत होत असलेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी मंगळवारी ही माहिती दिली. नांदेड येथील नानकसाई फाउंडेशनतर्फे साहित्यप्रेमी आणि नामदेवांचे अभ्यासक यांची दिंडी ३१ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता सचखंड एक्सप्रेसने प्रस्थान ठेवणार आहे. १ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता ही दिंडी अमृतसर येथे पोहोचणार आहे. एक दिवसाच्या विसाव्यानंतर ही दिंडी अमृतसर ते घुमान हे अंतर पायी मार्गक्रमण करणार आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे आणि विश्वस्त भूपिंदरसिंग शामपुरा यांनी या दिंडीला परवानगी द्यावी अशी विनंती पत्राद्वारे केली असून साहित्य महामंडळाने या दिंडीला परवानगी दिली असल्याचे देसडला यांनी सांगितले.
प्रतिशिर्डी समजल्या जाणाऱ्या शिरगाव येथून माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या पुढाकाराने साईभक्तांची दिंडी घुमानला पोहोचणार आहे. परभणी जिल्ह्य़ातील औंढा नागनाथ येथील नरसी नामदेव या संत नामदेवांच्या जन्मभूमीपासून एक दिंडी घुमानला प्रस्थान ठेवणार आहे. कवी नारायण सुमंत यांच्या मोडनिंब या गावापासूनही दिंडी निघणार आहे. मात्र, या तिन्ही दिंडय़ांची कार्यक्रम पत्रिका अद्याप निश्चित झालेली नाही. याखेरीज राज्यातून निघणाऱ्या वेगवेगळ्या दिंडय़ांचे घुमान येथे स्वागत करण्याची भूमिका साहित्य महामंडळ आणि सरहद संस्थेने घेतली असल्याचे देसडला यांनी सांगितले.
घुमान येथे संमेलनाला जाणाऱ्या साहित्यप्रेमींचा प्रवासखर्च, तीन दिवसांचा निवास, भोजन आणि न्याहरी यासाठी तीन हजार रुपये प्रतिनिधी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. जे संमेलनाला थेट येणार आहेत त्यांच्यासाठी प्रवासखर्च वगळून दीड हजार रुपये एवढे प्रतिनिधी शुल्क आकारण्यात येणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई येथील मुंबई मराठी साहित्य संघ, औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषद आणि नागपूर येथील विदर्भ साहित्य संघ या साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांसह कात्रज येथील सरहद संस्थेच्या कार्यालयामध्ये १ डिसेंबरपासून प्रतिनिधींची नावनोंदणी सुरू होणार आहे. ३१ जानेवारी ही प्रतिनिधी नोंदणीची अंतिम मुदत असेल. ग्रंथप्रदर्शनात सहभाग घेणाऱ्या प्रकाशकांना ११०० रुपये दराने गाळे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साहित्य संमेलनासाठी दोन मार्गावरून रेल्वे सोडण्यात याव्यात या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असेही भारत देसडला यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा