घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कोणत्याही साहित्यिकाच्या विमानवारीचा खर्च हा टोलशक्तीतून होणार नसल्याचे सरहद संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार यांनी कळविले आहे. हे संमेलन पूर्णपणे मराठी रसिकांच्या सहभागातून पार पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरहद संस्थेने गंभीर विषयांमध्ये वेळोवेळी महत्त्वाची भूमिका बजावली असून कधीही अशा विषयांचा धंदा होऊ दिलेला नाही. म्हणूनच एफ.सी.आर. क्रमांकही संस्थेने घेतला नाही, असे सांगून संजय नहार म्हणाले, संस्था गेली २५ वर्षे घुमान या मराठी माणसांशी संबंधित पंजाबमधील ठिकाणी काम करीत आहे. यामध्ये नितीन गडकरी यांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून येण्याची विनंती संस्थेने केली होती. मराठी माणसांच्या या सर्वात महत्त्वाच्या उत्सवासाठी बळ मिळावे व तेथील व्यवस्थांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, हाच नितीन गडकरी यांना सहभागी करण्यामागचा उद्देश आहे. भारत देसडला हे सरहद संस्थेशी १५ वर्षांपेक्षा अधिक काळ जोडले गेले असून ते सध्या विश्वस्तही आहेत. संमेलनाला दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ७५ लाख रुपये प्रतिनिधी शुल्क, २५ लाख रुपये राज्य सरकारचे आणि काही भाग सरहद संस्थेचा असणार आहे. पैसै कमी पडले तर स्वत: घालू आणि जास्त जमा झाले तर भर घालून घुमान गावासाठी खर्च करू, अशी भूमिका भारत देसडला यांनी घेतली आहे.

Story img Loader