संत नामदेव यांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे साहित्य सारस्वतांचा दरबार भरणार आहे. ‘सरहद’ संस्थेने दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून आगामी ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे घेण्याचा निर्णय मंगळवारी झाला. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये हे संमेलन होणार आहे. पंजाबमध्ये प्रथमच संमेलनाची पताका फडकणार असून २००१ मध्ये विजया राजाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली इंदूर येथील संमेलनानंतर तब्बल १४ वर्षांनी बृहन् महाराष्ट्रामध्ये संमेलन भरणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. ८८ व्या साहित्य संमेलनासाठी घुमान, बडोदा, उस्मानाबाद यांसह दहा ठिकाणांहून निमंत्रणे आली होती. त्यापैकी महामंडळाच्या स्थळ निवड समितीने घुमान आणि उस्मानाबाद येथे भेट देऊन पाहणी केली. उस्मानाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेने संमेलनासाठी तयारी चांगली केली होती. पण, यंदाचे संमेलन बृहन् महाराष्ट्रामध्ये घ्यावे असा निर्णय एकमताने झाला. त्यामुळेच आगामी संमेलन हे पंजाबमधील गुरुदासपूरजवळील बटाला तालुक्यातील घुमान या संत नामदेवांच्या कर्मभूमीमध्ये घेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन यांच्या स्थळ निवड समितीने घुमान येथे भेट दिली. मात्र, उस्मानाबाद येथे भेट दिलेल्या समितीमध्ये सदस्य कोण होते ही माहिती वैद्य यांनी गुलदस्त्यामध्येच ठेवली.
संत नामदेवांनी पंजाबमध्ये घुमान येथे मराठी साहित्याची मुहूर्तमेढ रोवली होती. आता ७०० वर्षांनंतर साहित्य महामंडळ घुमानला मराठी भाषेचा उत्सव करीत आहे याचा आनंद असल्याची भावना वैद्य यांनी व्यक्त केली. अमृतसर, चंदीगढ, जालंधर, लुधियाना आणि दिल्ली या भागातील पाच हजार मराठी बांधवांसह राज्यातील साहित्यिक आणि नामदेव समाजोन्नती मंडळाचे कार्यकर्ते संमेलनात सहभागी होतील. अन्य संमेलनांप्रमाणेच या संमेलनात ग्रंथप्रदर्शन असून प्रकाशकांना निमंत्रित केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
साहित्य महामंडळाने अधिकृतपणे अद्याप कळविलेले नसले, तरी पंजाबमध्ये संमेलन होत असल्याचा आनंद आहे, अशी भावना ‘सरहद’ संस्थेचे प्रमुख व संमेलमाचे संयोजक संजय नहार आणि निमंत्रक भारत देसडला यांनी व्यक्त केली. घुमान हे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र व्हावे यासाठी प्रयत्नशील असून या संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला पंजाबशी जोडण्याचे काम कसोशीने करू, असेही नहार यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghuman sant namdev marathi sahitya sammelan