संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या कालावधीत दिंडय़ांतील वाहनांना टोल माफी मिळावी तसेच संबंधित ग्रामपंचायती आणि नगर परिषदा यांच्या निधीमध्ये वाढ होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. पालखी सोहळ्याच्या कालावधीत आरोग्य, पिण्याचे पाणी, वाहतूक, रस्त्यांची स्वच्छता, कायदा आणि सुव्यवस्था याबाबत सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही बापट यांनी दिल्या.
पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बापट आणि सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, खासदार अमर साबळे, आमदार बाबूराव पाचर्णे, राहुल कुल, दत्तात्रय भरणे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अ‍ॅड. रामहरी रूपनवर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर या वेळी उपस्थित होते.
सौरभ राव यांनी पुणे जिल्ह्य़ाच्या तयारीची माहिती दिली. दोन्ही पालख्या ज्या मार्गावरून जातात तेथे आवश्यक त्या ठिकाणी एकदिशा मार्ग केला जाणार आहे. पालखी मार्गावरील खाद्यपदार्थ दुकानांची अन्न आणि औषध प्रशासनामार्फत तपासणी केली जाणार आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत गटाची पथके तैनात केली जाणार आहेत. पालखी तळाच्या ठिकाणी वीजपुरवठा अखंडित राहावा यासाठी महावितरणची फिरती पथके तैनात केली जाणार आहेत. दिंडीप्रमुखांनी अनुदानित सिलिंडरसाठी आवश्यक अर्ज भरून तो संबंधित विभाग किंवा गॅस कंपनीकडे सुपूर्द केल्यास त्यांना अनुदानित गॅस सिलिंडर देता येईल, असेही सौरभ राव यांनी सांगितले. पालखी तळावरील अतिक्रमणे काढून टाकावीत, पालखी मार्गावरील विहिरींचे अधिग्रहण करावे, पाण्याची तपासणी करावी, मोबाइल कनेक्टिव्हिटी सुरळीत राहावी यासाठी फिरते मोबाइल टॉवर उभे करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा