भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे, असं वक्तव्य केलंय. ते भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याविरोधात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांना समोर ठेवलेला चहा घेण्याबाबात सांगण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
गिरीश बापट म्हणाले, “चहाचा तर घोट घ्यायचा आहे, पण अनेकांच्या गळ्याचा देखील घोट घ्यायचा आहे. किरीट सोमय्या अनेकांची वाट लावण्याचं काम करत आहे. गेली अनेक वर्ष किरीट सोमय्या आणि मी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका, आंदोलनं, कार्यक्रमाला जातो. त्यावेळी ज्या पद्धतीने त्यांची तलवार चालते.”
“काँग्रेसवाले गोमुत्र घेऊन गेलेत. तपासायला पाहिजे. कदाचित वाईन असेल. त्याचा वास इथपर्यंत येतोय. मी फक्त वासावर आहे, पित नाही कधी. त्यामुळे मी किरीट सोमय्या यांचे आभार मानतो. संजय राऊतपासून अनेक जण म्हणत असतील या किरीट बाबाला तुम्ही यूपीत का नाही पाठवलं? पण अनेक अखिलेश इथं देखील आहेत. त्यांची वाट लावण्याचं काम सोमय्या करत आहेत,” असंही गिरीश बापट यांनी म्हटलं.
हेही वाचा : “मला मारहाण केल्याप्रकरणी शहराध्यक्षासह ‘या’ ८ शिवसेना नेत्यांना अटक होणार”, किरीट सोमय्यांचं ट्वीट
किरीट सोमय्या म्हणाले, “पुण्यातील कोविड सेंटरचा ठेका मिळालेल्या कंपनीचा मालक चहावाला आहे. तसेच हा चहावाला केईएम रुग्णालयामागे असतो. ठाकरे सरकारने पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला. संजय राऊत यांची ही बेनामी कंपनी आहे. पुणे महापालिकेने त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत ४ ठेके दिले.”
“उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बेनामी कंपनी आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” असंही सोमय्या यावेळी म्हणाले.