पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पुणे मेट्रोपोलिटिन रिजनल डेव्हलपमेंट अॅथॉरिटी- पीएमआरडीए) अध्यक्षपदी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमआरडीएच्या स्थापनेबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर पीएमआरडीएची अधिसूचना राज्य शासनाने बुधवारी प्रसिद्ध केली.
पुणे महापालिका, पिंपरी महापालिका आणि पुण्याच्या तीन हजार चौरस किलोमीटर परिसराचा एकात्मिक विकास करण्यासाठी पीएमआरडीएची स्थापना करण्याचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे चर्चेत होता. तशा घोषणाही वेळोवेळी झाल्या. मात्र प्राधिकरणाची प्रत्यक्षातील स्थापना झाली नव्हती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीएमआरडीएच्या स्थापनेबाबत गेल्या आठवडय़ात विधानसभेत केली होती. त्या पाठोपाठ शासनाने लगेचच आता पीएमआरडीएच्या स्थापनेची अधिसूचनाही बुधवारी प्रसिद्ध केली.
मुंबई व परिसराच्या विकासासाठी स्थापन झालेल्या एमएमआरडीएचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात आले होते. तशाच पद्धतीने पीएमआरडीएचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे राहणार का पालकमंत्र्यांना अध्यक्षपदी नियुक्त केले जाणार याची उत्सुकता होती. अधिसूचनेनुसार पीएमआरडीएच्या अध्यक्षपदी पालकमंत्री गिरीश बापट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणाऱ्या या प्राधिकरणाच्या समितीवर एकूण पंचवीस सदस्य असतील.
या सदस्यांमध्ये पुणे आणि पिंपरी या महापालिकांचे महापौर व आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मावळ, हवेली, भोर, दौंड, शिरुर, मुळशी, खेड, तळेगाव, लोणावळा व आळंदी नगरपरिषदांचे सभापती व मुख्याधिकारी, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, जमाबंदी आयुक्त हे या प्राधिकरणाचे सदस्य असतील. नगररचना विभागाचे सहसंचालक हे प्राधिरकणाचे सदस्य सचिव असतील. लष्कराच्या अधिपत्याखाली येणाऱ्या पुणे, खडकी व देहूरोड कॅन्टोन्मेंटना पीएमआरडीएमधून वगळण्यात आले आहे.
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यालय पिंपरी-चिंचवड येथील नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये सुरू करण्यात येणार आहे. या प्राधिकरणाचे कामकाज सुरळीतपणे चालेल यात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.