राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवून ४० वर्षे करावी, असे माझेही व्यक्तिश: मत आहे. ही वयोमर्यादा वाढविण्यासंदर्भात राज्य सरकारला अनुकूल करू, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिली.
शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित विद्यार्थी हक्क परिषदेचे उद्घाटन गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, आमदार भारती लव्हेकर, रिपब्लिकन नेते अविनाश महातेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सुधाकर जाधवर या वेळी उपस्थित होते.
बापट म्हणाले, की स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसवर सरकारचे बंधन नाही. पण, भविष्यात अशा क्लासेसमध्येही गरीब विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद असलेला कायदा करावा लागेल. पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान नसते. अनेक विद्यार्थ्यांना कामावर असताना सुचत नाही. निवृत्त झाल्यावर मात्र ते अनेक गोष्टींवर बोलतात. शेतक ऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यासंदर्भात सरकार विचार करीत आहे.
आम्ही सत्तेत आहोत की नाही हे माहीत नाही. पण, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे सांगून महादेव जानकर यांनी, राज्यातील सरकार पुरोगामीपणाचा आव आणणारे नाही, असा निर्वाळा दिला. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रामाणिकपणे करणार असाल तरच या क्षेत्राचा विचार करा. शहरात राहून आई-वडिलांचे पैसे खर्च करू नका, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
ज्यांच्यासाठी लढलो त्या शेतक ऱ्यांच्या मुलांचे जे प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी हे व्यासपीठ सुरू केले असल्याचे सांगून राजू शेट्टी म्हणाले,की इतकी वर्षे साखरसम्राटांविरोधात लढलो. सरकारी जागा हडप करून आयकर न भरता भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शिक्षणसम्राटांविरोधात आता लढण्याची वेळ आली आहे. सरकारकडून सवलती घेणाऱ्या संस्थांनी किमान ५ ते १० टक्के गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलेच पाहिजे.
स्पर्धा परीक्षांच्या क्लासचालकांकडून भरमसाठ शुल्क आकारून पालकांना नागविले जात असल्याची टीका महादेव जानकर यांनी केली. सुधाकर जाधवर, सदाभाऊ खोत यांनी मनोगत व्यक्त केले.
माझी अवस्था सूनबाईसारखी
मित्र पक्षाने बोलावल्यानंतर सासूबाईने बोलावल्यावर सुनेने यावे तसा मी या कार्यक्रमाला आलो आहे. सूनबाई करायचे तेच करते, पण सासुबाईंचा मान राखते, अशी कोटी करीत मी सामान्य कार्यकर्ता असल्याने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा