जंगली महाराज बॉम्बस्फोटानंतर शहरात सीसीटीव्ही बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पण, एक वर्षे झाले तरी अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. किती जणांचे जीव गेल्यानंतर सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत, असा सवाल आमदार गिरीश बापट यांनी उपस्थित केला. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर तरी लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
गणेश उत्सवावर पोलिसांनी टाकलेल्या बंधनासंदर्भात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी आमदार गिरीश बापट, महादेव बाबर, माधुरी मिसाळ, भाजपचे अनिल शिरोळे, नगरसेवक प्रशांत बधे आदी उपस्थित होते. त्या निवेदनात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देणे बंद करावे, विसर्जन मिरवणुकीचा वाहतूक परवाना व मंडळाचा परवाना मिळविण्यासाठीचा त्रास थांबवावा. पारंपरिक वाद्य वाजविण्यास रात्री बारानंतर परवानगी द्यावी, ध्वनिक्षेपक यंत्रणा जप्त करू नये. व्यापारी जाहिराती देणाऱ्यांना नोटीस देऊ नये. वर्गणी मागणाऱ्या मंडळांवर खंडणीचे गुन्हे दाखल करू नये, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील आमदारांनी त्यांच्या निधीतून सीसीटीव्हीसाठी पंधरा ते वीस लाख रुपये दिले होते. पण, वर्ष झाले तरी एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आलेला नाही. शासन राज्यभरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी २५३ कोटी रुपयांची एकच निविदा काढत आहे. त्यासाठी उशीर होत असेल, तर पुण्याची सुरक्षितता लक्षात घेऊन स्वतंत्र टेन्डर काढावे. याबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली असता या महिन्याच्या अखेरीपर्यंत कॅमेरे बसविण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. या वेळेत कॅमेरे बसविले नाही, तर भाजप आणि शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशाराही बापट यांनी दिला. वेळीच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असते तर डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी कॅमेऱ्यात कैद झाले असते, असे त्यांनी स्पष्ट केले.