पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला जात असताना पालकमंत्री म्हणून आपल्याशी चर्चाही केली नाही, असे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासंदर्भात कायदा असल्याने आणि मी मंत्री असल्यामुळे बोललो नाही, असा खुलासा रविवारी केला.
हेल्मेट सक्तीविरोधात पुणेकरांचे आक्षेप ऐकून घेण्यासाठी आलेले परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्येच गिरीश बापट यांनी हा मुद्दा उपस्थित केला. हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करताना वाहतूक पोलिसांनीही पालकमंत्री म्हणून ही बाब आपल्याशी बोलायला हवी होती, याकडेही बापट यांनी लक्ष वेधले.
‘‘कायद्याची सक्ती केली तर अपेक्षित परिणाम साधता येत नाही. कायदा होण्याआधीच पळवाट काढली जाते असे म्हटले जाते. त्यामध्ये पुणेकरांनी प्रावीण्य संपादन केले आहे,’’ असे सांगून बापट म्हणाले,‘‘लोकांच्या हिताचे कायदे झाले पाहिजेत. नागरिकांचा होत असलेला उद्रेक पाहून हेल्मेट सक्ती कायद्याच्या अंमलबजावणीचा पुनर्विचार झाला पाहिजे. हेल्मेट घातले नाही म्हणून दंडात्मक कारवाई करण्याऐवजी दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली असती तर अधिक आनंद झाला असता आणि अशा अधिकाऱ्यांचे मी हार घालून स्वागत केले असते.’’
हेल्मेटला आमचा विरोध नाही. मात्र, सक्ती होता कामा नये, अशी भूमिका हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीने मांडली. या प्रश्नावर सर्वच पक्ष हे पुणेकरांच्या बाजूने असल्याचे अंकुश काकडे यांनी सांगितले. हेल्मेटचे तोटे याविषयी सूर्यकांत पाठक यांनी विवेचन केले. रोगापेक्षा इलाज जालीम होऊ नये, अशी भूमिका संदीप खर्डेकर यांनी मांडली. विवेक वेलणकर यांनी महापालिका हद्दीमध्ये हा कायदा लागू करता येत नसल्याचे सांगितले. पुणेकरांना दिलासा द्यावा आणि हेल्मेटसंदर्भात प्रबोधनाची कालमर्यादा ठरवावी, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली.
गेल्या वेळी सर्व आमदारांनी विधिमंडळात हेल्मेट घालून हेल्मेट सक्तीचा निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडले होते, याची आठवण विनायक निम्हण यांनी करून दिली. या प्रकरणामध्ये राजकारण आणून पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्यांनी बौद्धिक दिवाळखोरी नाही, तर नैतिक दिवाळखोरीचे दर्शन घडविले असल्याचे मत मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
हेल्मेट नाही, पुणेरी पगडी!
हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने सुरू केलेल्या आंदोलनानंतर ७२ तासांत समितीचे म्हणणे ऐण्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल दिवाकर रावते यांचा पुणेरी पगडी परिधान करून सत्कार करण्यात आला. त्या वेळी ‘हे हेल्मेट नाही तर पुणेरी पगडी आहे’, अशी कोटी गिरीश बापट यांनी केली. हेल्मेटच्या प्रश्नावरून टीकाटिप्पणी केल्याने माझा हेल्मेटविक्रीचा व्यवसाय आहे की काय असे निष्कारण गैरसमज होतात. माझी छोटी बहीण म्हणून मी दुर्लक्ष करतो, अशा शब्दांत रावते यांनी मेधा कुलकर्णी यांच्या टिप्पणीवर भाष्य केले.