व्यवस्था मजबूत झाल्याशिवाय कोणताही देश महासत्ता होणार नाही. त्यासाठी भारतामध्ये अर्थविषयक जाणीव समाजात रुजली पाहिजे, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.
वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्रात ‘भारत महासत्ता बनेल का? ’ या विषयावर गिरीश कुबेर यांनी पहिले पुष्प गुंफले. आमदार बाळा भेगडे, विद्या निकेतन सभेचे अध्यक्ष अ‍ॅड. माधव भोंडे, मुख्याधिकारी गणेश शेटे, व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा प्रगती साळवेकर, ध्रुव आगरवाल, श्रीकृष्ण वर्तक, रवींद्र कुलकर्णी, संजय गायकवाड, प्रशांत पुराणिक, अरिवद मेहता, सुप्रिया घमंडे या वेळी उपस्थित होते.
गिरीश कुबेर म्हणाले, भारत महासत्ता होणार, अच्छे दिन येणार, असे म्हणून काही अच्छे दिन येत नाहीत. त्याकरिता व्यवस्था मजबूत व्हायला हवी. चार महानगरातील ४० माणसं श्रीमंत झाली म्हणजे देश श्रीमंत होत नाही. केवळ इतिहासामध्ये रमण्यापेक्षा समस्यांवर मार्ग काढण्यासाठी व्यवस्था सशक्त केली पाहिजे. केवळ व्यक्ती मोठी होऊन देश मोठा होत नाही. अमेरिका, इंग्लंड, चीन, जपान, जर्मनी हे देश महासत्ता होण्याच्या दृष्टीने प्रवास करीत असताना त्यांनी व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला आहे.
आपल्या देशाची उद्दिष्टे नियोजनापमाणे पूर्ण होत नाहीत, पहिल्या पंचवार्षकि योजनेची पूर्तता तिसऱ्या पंचवार्षकि योजनेमध्ये होते. आपल्याकडे आजही गरीब कोणाला म्हणायचे हेच कळलेले नाही. आपण महासत्ता कसे होणार. आजही भारताचा ८२ टक्के खर्च हा तेल आयातीवर होत आहे. ज्या देशांची व्यवस्था मजबूत झाली ते देश महासत्ता झाले. भारतात व्यवस्था सबल झाल्याशिवाय आपण महासत्ता होऊ शकत नाही, याकरिता केवळ सरकारने नव्हे तर आपण सर्वानी व्यवस्था सुधारण्यासाठी पुढे यायला हवे. लोकशाहीच्या चार स्तंभांनी प्रामाणिक राहून ते साध्य होणार नाही, तर सर्व समाजाने तसे वागायला हवे असेही गिरीश कुबेर यांनी सांगितले.

Story img Loader