एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारची निर्घृण हत्याप्रकरणातून महाराष्ट्र सावरत नाही तोवर पुण्यातूनच दुसरी एक धक्कादायक घटना समोर आली. मात्र, यावेळी दोन तरुणांनी दाखवलेल्या प्रसांगवधान आणि समयसूचकतेमुळे या तरुणीचा जीव वाचला आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत पेरुगेट चौकीजवळ काल (२७ जून) शंतनू जाधव या तरुणाने एका मुलीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यादरम्यान तरुणी पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण हल्लेखोर इतका संतापलेला होता की त्याने तिच्या हत्येचाच विडा उचलला होता. परंतु, एमपीएससीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांनी या पीडितेचा जीव वाचला आहे. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोपीचा प्रतिकार केला. यानंतर आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं याविषयी त्यांनी माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> पुण्यातील कोयता हल्ल्यावरून राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले, “माझ्या महाराष्ट्र सैनिकांना…”

“मी सकाळी नऊ-साडेनऊ वाजता अभ्यासिकेत येत होतो. मी पायऱ्यांवरून वर चढायला जात होतो तेवढ्यात मला मोठा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं तर एका मुलीवर वार झाला होता. ती माझ्या दिशेनेच पळत आली. तो तिच्या मागून कोयता घेऊन धावतोय. ही सामाजिक विकृती आहे की तो कोयता घेऊन मागून पळतोय आणि पोरगी ओरडत वाचवा म्हणून पळतेय, तरी लोक बघत बसलेत. तिला वाचवायचं सोडून लोक आजूबाजूला सरकले. ती पळत पळत दुकानात गेली. ती दुकानात आत जाण्याचा प्रयत्न करत असताना दुकानवाल्याने शटर खाली खेचलं. त्यामुळे ती दुकानाच्या दारात बसली. तो खूप रागात होता, तो तिला मारणारच होता. त्यामुळे मी पळत गेलो. तो कोयत्याने तिच्यावर वार करणार तेवढ्यात मी मागून त्याला पकडलं. तेवढ्यात हा (हर्षद पाटील) मदतीला आला. जे आधी बघत होते, तेच तिला वाचवायला आले. पण तीन-चार सेकंदात ती पोरगी वाचली”, अशी अंगावर काटा आणणारी हकिगत लेशपाल जवळगेने सांगितली. लेशपाल टीव्ही ९ मराठीसोबत बोलत होता.

हेही वाचा >> पुणे: कोयता हल्ल्यातून विद्यार्थिनीला वाचवणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५१ हजारांचं बक्षीस, जितेंद्र आव्हाडांची घोषणा

“दर्शना पवार ताईंची ताजी केस असताना समाज आपली जबाबदारी झटकतोय. हे पाहत असताना वाईट वाटतं”, असंही लेशपाल म्हणाला. “दिल्लीत झालेली केस माहित होती, व्हिडीओ पाहिला होता. व्हिडीओ पाहत असातनाही मी तेव्हा (व्हिडीओतील)आजूबाजूच्या लोकांना शिव्या देत होतो. तो मारतोय तुम्हाला दिसत नाहीय का? हाच प्रसंग माझ्यासमोर आला होता. मला काय झालं माहित नाही. मी पळत सुटलो. काय होईल ते होईल बिचारी पोरगी वाचेल. हे प्रकरण झाल्यानतंर मी खोलीवर गेलो. खोलीवर एक दीड तास खूप रडलो. आताही मला रडू येतंय. ती पोरगी मेली असती. पण एका सेकंदामुळे ती वाचली”, असंही लेशपालने सांगितलं.

“मी खोलीमध्ये जाऊन खूप रडलो. कारण अजून ३ सेकंद मला वेळ झाला असता तर मला सर्वांना सांगावं लागलं असतं की तिचा खून कसा झाला? आणि असं झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो”, असंही लेशपालने सांगितलं.

हर्षद पाटीलने काय सांगितलं?

भर रस्त्यात तरुणीवर हल्ला होत असताना तिथे असलेला जमाव हल्ला उघड्या डोळ्यांनी पाहत होता. हातात कोयता असल्याने या हल्लेखोराला प्रतिकार करण्याकरता कोणीही पुढे येण्यास धजावत नव्हता. परंतु, लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी हिंमत एकवटली आणि एकमेकांच्या साथीने या हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. याविषयी हर्षद पाटील म्हणाला की, “मी अभ्यासिकेच्या खाली थांबलो होतो. तिथून ओरडण्याचा आवाज आला. कोयता घेऊन धावत येताना एक तरुण मला दिसला. आधी मीही घाबरलो, कारण येथे कोयता गँग आहे, हे माहित होतं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की तो मुलीच्या मागून धावतोय. तितक्यात हे (लेशपाल जवळगे) तिथे गेले. त्यांनी त्याला पहिल्याच वारमध्ये अडवलं. मी तिथे पोहोचलो आणि त्याचा हात पकडून हातातून कोयता काढून घेतला. तेवढ्यात बाजूचे लोक आणि मित्र आले. हे लोक त्याला बेदम मारहाण करत होते. आम्ही एमपीएससीची तयारी करत असल्याने आम्हाला एवढं माहितेय की आपण कायदा हातात घेणं चुकीचं आहे. त्यामुळे त्याला लोकांच्या तावडीतून वाचवणं हा टास्क होता. यावेळी आम्हालाही लोकांचा मार बसला. परंतु, आम्ही अखेर या हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिलं.”

हेही वाचा >> सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला करणारा तरूण ताब्यात

सदाशिव पेठेत हल्ला का झाला?

वीस वर्षीय तरुणी कोथरूड येथील सुतरदारा भागात राहायला आहे. आरोपी शंतनु जाधव तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तिचा पाठलाग करून त्रास देत होता. त्याने सदाशिव पेठेत पावन मारुती मंदिराजवळ सकाळी तरुणीला गाठले. तरुणीला अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला झिडकारले. तेव्हा त्याने तिच्यावर कोयत्याने वार केले. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl are running screaming to save herself but the young people who saved from koita attack told a thrilling story sgk
Show comments