पुणे : कात्रज भागात सिमेंटचे पाइप तयार करणाऱ्या कंपनीतील पाण्याच्या हौदात पडून दोन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. सुरभी विमलकुमार गौतम (वय २) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे.
दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी एकेआरसीसी या कंपनीचे मालक अश्रफ अली खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विमलकुमार शिवशंकरलाल गौतम (वय २६, रा. जांभुळवाडी) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर दरीपुलाजवळ खान यांची एकेआरसीसी कंपनी आहे. या कंपनीत सिमेंटचे पाईप तयार केले जातात. पाइप तयार केल्यानंतर ते पाण्यात भिजवले जातात. भिजवण्यासाठी कंपनीच्या आवारात पाण्याचा मोठा हौद तयार करण्यात आला आहे.
विमलकुमार गौतम कंपनीच्या आवारात राहायला आहे. विमलकुमारची दोन वर्षांची मुलगी हौदाजवळ खेळत असताना तोल जाऊन त्यात पडली. हौदाजवळ कठडे नसल्याने दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले. सुरक्षाविषयक उपाययोजना न करता दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी पोलिसांनी कंपनी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक धामणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.