पुणे : रस्ते अपघातात जीव गमाविलेल्या मुलीमुळे सहा जणांना जीवदान मिळाले आहे. नारायणगाव येथे झालेल्या अपघातात ही मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला मेंदूमृत घोषित करण्यात आल्यानंतर तिच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. तिचे अवयव सहा जणांना प्रत्यारोपित करण्यात आले आहेत.

आँचल शिंदे असे अपघातात जीव गमाविलेल्या मुलीचे नाव आहे. तिने २५ जानेवारीला तिचा १७ वा वाढदिवस साजरा केला होता. नारायणगाव येथे झालेल्या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती बिघडल्याने तिला बाणेरमधील मणिपाल रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तिचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले परंतु, त्यात यश आले नाही. डॉक्टरांनी अखेर तिला मेंदूमृत घोषित केले. मुलीच्या जाण्याच्या दु:खातही तिच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.

विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने या मुलीच्या अवयवदानाची प्रक्रिया पार पाडली. या मुलीचे एक मूत्रपिंड मणिपाल रुग्णालयातील ३९ वर्षीय महिलेला, एक मूत्रपिंड व स्वादुपिंड ज्युपिटर रुग्णालयातील ३७ वर्षीय महिलेला, यकृताचा एक भाग सह्याद्री रुग्णालयातील ५ वर्षीय मुलाला तर दुसरा भाग सह्याद्री रुग्णालयातील ४३ वर्षीय पुरुषाला आणि फुफ्फुसे डी.वाय. पाटील रुग्णालयातील ३३ वर्षीय पुरुषाला देण्यात आला, अशी माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या सचिव आरती गोखले यांनी दिली. याबाबत मणिपाल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ.भूषण नगरकर म्हणाले की, मुलीच्या कुटुंबीयांना आमच्या पथकाने आधार दिला. त्यांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यांनी घेतलेला निर्णय हा खूप मोठा असून, तो इतरांना प्रेरणा देणारा आहे. या उदाहरणांमुळे अनेक जण अवयवदानासाठी भविष्यात पुढे येतील.

आमची मुलगी गेली असली तरी तिचे जाणे व्यर्थ ठरू नये, यासाठी आम्ही अवयवदानाचा निर्णय घेतला. तिच्या अवयवांच्या माध्यमातून ती आता इतरांमध्ये जिवंत आहे. आमच्याप्रमाणे इतर पालकांनी अशा प्रसंगी अवयवदानाचा निर्णय घेऊन इतरांना जीवदान द्यावे. वर्षा व रवींद्र शिंदे, आँचलचे पालक

Story img Loader