पुण्यातील हडपसर येथील हिंगणे मळ्याजवळ असलेल्या कालव्यात पडून अडीच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आई-वडिलांचं लक्ष नसताना ही चिमुकली पाण्यात पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांना तिचा मृतदेह सापडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मार्च रोजी सकाळी विजय खुडे हे पत्नी शिवानी आणि दोन मुलांना रिक्षातून घेऊन हिंगणे मळ्याजवळ असलेल्या कालव्यात कपडे धुण्यासाठी आले होते. विजय आणि शिवानी हे दोघे जण कपडे धुण्यासाठी पाण्यात उतरले. तर चार वर्षाचा रुद्र आणि अडीच वर्षाची त्रिशाका रिक्षाच्या बाजूला खेळत बसले होते. ते दोघे जण खेळत असताना काही समजण्याच्या आत त्रिशाका पाण्यात पडली. मात्र, आसपासच्या लोकांना याबद्दल माहित झाले नाही.
विजय आणि शिवानी यांनी कपडे धुतल्यानंतर मुलांचा शोध घेतला. तेव्हा रुद्रला त्रिशाका कुठे आहे, असं विचारलं. त्याने मळ्याच्या दिशेनं बोट दाखवलं. पण काही केल्या ती सापडली नाही. बराच वेळ शोध घेऊन ही मुलीचा तपास लागत नसल्याने त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. पोलिसांनी आसपासच्या भागातील सीसीटीव्ही चेक केल्यावर लहान मुलासोबत खेळत असताना,त्रिशाका दिसत होती.पण काही वेळाने पाण्यात पडल्याचे दिसून आले. त्यानंतर जवळपास तीस किलोमीटर अंतरावर यवत इथे त्रिशाकाचा मृतदेह आढळून आल्याचे हडपसर पोलिसानी सांगितले.