लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : वडगाव शेरी भागात मुलीने मित्राच्या मदतीने सख्ख्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रसाधनगृहात पाय घसरून पडल्याने आईचा मृत्यू झाल्याचा मुलीने बनाव रचला. मुंबईतील नातेवाइकाने तक्रार दिल्यानंतर पोलीस तपासात खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे.

मंगल संजय गोखले (वय ४५, राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत गोखले यांचे नातेवाईक विनोद शाहू गाडे (वय ४२, रा. गोवंडी, मुंबई) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मुलीसह तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर, वडगावशेरी) आणि योशिता संजय गोखले (वय १८, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

आणखी वाचा-मंत्रिमंडळाच्या बैठकीतील आयत्या वेळी मंजूर झालेल्या प्रस्तावांची माहिती गुलदस्त्यात… ‘आप’ने केली ‘ही’ मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल गोखले यांच्या बॅंक खात्यातून मुलीने मित्राच्या मदतीने परस्पर पैसे काढले. ही बाब आईला समजल्यानंतर ती रागवेल, अशी तिला भीती होती. तिने आई झोपेत असताना तिच्या मित्राला घरातील हातोडा दिला. यशने मंगल यांच्या डोक्यात हातोड्याने वार करून जखमी केले. तसेच मुलगी योशिताने आईचे स्कार्फने तोंड दाबून धरले. हा प्रकार कोणाला कळू नये, यासाठी आई पाय घसरून पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा बनाव रचला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत माने तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl killed her mother with the help of friend pune print news rbk 25 mrj