Girl Raped in Swargate Bus Stand Pune : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्टँडवर धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या तरुणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडवर बलात्कार करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. त्या एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, “पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अनेक तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात. तसं पाहिलं तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत. पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असतं. पण स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे.”
“काल सकाळी ही घटना घडली. संबंधित मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे. त्यानंतर मुलीने सकाळी साडे नऊ वाजता पोलिसांत तक्रार नोंदवली. यात पोलिसांकडून जातीने लक्ष घातलं जातंय. सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेने केलेल्या वर्णनानुसार माहिती गोळा केली जात आहे. आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तयार केले असून ग्रामीण भाग आणि स्वारगेट भागात तपास सुरू आहे. आरोपीचा सीडीआर काढला आहे, त्यानुसार लोकेशननुसार त्याचा माग काढला जात आहे”, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.
स्वारगेट येथे नक्की काय घडलं?
याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले, पीडित २६ वर्षाची तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली. तिला एकाने फलटणला जाणारी गाडी इकडे लागत नाही, तिकडे लागते, असे सांगितले. त्यावर या तरुणीने इकडेच फलाटावर लागते, असे सांगितले. त्यावर त्याने तिच्याशी गोड बोलून तिला मी १० वर्षे इथे आहे. तिकडे लागणारी बसच फलटणला जाते, असे सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार होता. तेव्हा त्याने तुम्ही दरवाजा उघडून आत जा, असे सांगितले. तेव्हा ही तरुणी बसमध्ये गेली. तेव्हा तिच्या मागोमाग तो आत आला. त्याने दरवाजा लावून घेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली. अर्ध्या वाटेवरुन ती परत आली आणि तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली स्वारगेट पोलिसांनी तातडीने तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
बसमध्ये अंधार होता त्याचा फायदा घेऊनच आरोपीने दुष्कृत्य केलं-पाटील
स्मार्तना पाटील पुढे म्हणाल्या, “बसमध्ये अंधार होता, त्यावर ती आरोपीला म्हणाली की या बसमध्ये तर अंधार आहे. तर आरोपी तिला म्हणाला ही बस रात्री आली आहे. लोक झोपले असतील म्हणून अंधार आहे. तुला हवं तर तू चेक कर. तिला बसमध्ये जायला सांगितलं. सदर मुलगी अंधार का आहे हे बघायला आतमध्ये गेली. तेव्हा आरोपी तिच्या मागोमाग बसमध्ये शिरला त्याने बसचा दरवाजा लॉक केला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी उतरुन गेल्याचंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहे. तसंच मुलगीही उतरली आणि बसने गावी जायला निघाली होती. या दरम्यान तिने हा प्रकार तिच्या मित्राला सांगितला. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर तिने हा सगळा प्रकार मित्राला सांगितला. मित्राने तिला सांगितल्यानंतर ती आमच्याकडे म्हणजेच पोलीस ठाण्यात आली. तिच्या तक्रारीनंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासलं.