रामदास आठवले यांची मागणी
पुणे : कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारने ६३ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यात वाढ करून शंभर कोटी रुपयांचा आराखडा करण्यात यावा आणि विजयस्तंभ परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी केली.
कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर आठवले पत्रकारांशी बोलत होते. विजयस्तंभ परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करू. मागील वर्षीच्या कटू आठवणी विसरून यंदा सामाजिक सलोखा दिसून आला. असाच सामाजिक सलोखा यापुढेही कायम ठेवावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
दरम्यान, पेरणे फाटा येथे पक्षाच्या वतीने आयोजित सभेला वाहतूककोंडीमुळे आठवले यांना वेळेत पोहोचता आले नाही. राष्ट्रीय सचिव अविनाश महातेकर, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.