जुने मखर आणून द्या, नवीन घेऊन जा’ असा अभिनव उपक्रम एका मखर विक्रेत्याने राबविला असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एकदा वापरलेल्या मखराचा पुढच्या वर्षी वापर केला जात नाही ही पुणेकरांची सवय ध्यानात घेऊन अनिल कांबळे या व्यावसायिकाने हा उपक्रम राबविला आहे. करोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे सर्व सण साजरे करण्यावर बंधने होती. यंदाचा गणेशोत्सव नेहमीच्या परंपरेनुसार जल्लोषात साजरा होणार आहे. गौरी गणपतीच्या सजावटीच्या साहित्याने शहरातील बाजारपेठा सध्या सजल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवार पेठेतील मखर विक्रेते अनिल कांबळे यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

दरवर्षी आपल्याला गणपती आणि गौरीच्या सजावटीसाठी आकर्षक मखर आवश्यक असतात. एका वर्षी वापरलेली मखर दुसऱ्या वर्षी सहसा वापरले जात नाही आणि अनेकदा ते टाकून दिले जाते. यावर उपाय म्हणून अनिल कांबळे यांनी अनोखी क्लृप्ती लढविली आहे. त्यांच्याकडून घेतलेली मखर पुढच्या वर्षी त्यांना परत देऊन त्या बदल्यात ग्राहक दुसरे मखर घेऊ शकतात असा उपक्रम त्यांनी राबविला आहे.

हेही वाचा : पुणे : विद्युत रोषणाईच्या माळांना वाढती मागणी

कांबळे म्हणाले, गेल्या १५ वर्षांपासून मी या व्यवसायात आहे. यंदा गणपतीसाठी वापरलेले मखर नागरिक टाकून देतात आणि त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होते, ही बाब ध्यानात आली. त्यावर उपाययोजना करण्याचे निश्चित केले. त्यातून ही कल्पना आकाराला आली. आमच्याकडून घेतलेले मखर एकदा आम्हाला करून त्या बदल्यात नवीन मखर त्यांनी घेऊन जावे, असे आवाहन आम्ही ग्राहकांना केले. या नव्या मखर खरेदीवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. सध्या महागाईच्या काळात नवीन मखर घेण्यापेक्षा जुन्याच्या बदल्यात नवीन मखर घेण्याकडे नागरिकांचा कल असल्याने हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.

हेही वाचा : पुणे : गणेशोत्सवात देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात ; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

जुन्या मखरांची डागडुजी करून हे मखर नव्या स्वरूपात बाजारामध्ये आणले जाते. त्यामुळे एकच मखर अनेकदा वापरून होते आणि ग्राहकांनाही दरवेळी नवीन मखर रास्त दरामध्ये उपलब्ध होते. आमच्याकडे एक फुटापासून ते तीन फुटांपर्यंत गणपती आणि गौरीसाठी मखर आहेत. धबधब्याचे मखर, गोमुखाचे मखर, मूषक मखर, त्रिशूल मखर, दोन मजली मखर अशा विविध पद्धतीचे मखर ७०० रुपयांपासून ते १७ हजार रुपये किमतीपर्यंत मखर उपलब्ध आहेत, असे कांबळे यांनी सांगितले.

Story img Loader