पुणे : करोनावर उपचारांसाठी नायट्रिक ऑक्साईडचा नाकातील फवारा वापरल्यास २४ तासात तब्बल ९४ टक्के एवढा विषाणूचा भार कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्लेनमार्कतर्फे नायट्रिक ऑक्साईड नेसल स्प्रेची निर्मिती करण्यात आली आहे. द लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकाने याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. नायट्रिक ऑक्साईड नेसल स्प्रे सात दिवस दररोज सहा वेळा वापरल्यास नाकाच्या पोकळीतून करोना विषाणू काढून टाकण्यासाठी मदत होते. त्यामुळे संसर्ग झाल्यास तो लवकरात लवकर थोपवणे शक्य झाल्यामुळे आजाराची तीव्रता वाढू न देणे शक्य असल्याचा दावा ग्लेनमार्कतर्फे करण्यात आला आहे.
ग्लेनमार्कने तयार केलेल्या हे औषध भारतात फॅबिस्प्रे या नावाने विकले जात आहे. मात्र, ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे आवश्यक असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. ऑगस्ट २०२१ ते जानेवारी २०२२ या काळात भारतात २० ठिकाणी या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांदरम्यान करोनाची लक्षणे दिसू लागलेल्या रुग्णांना तीन दिवसांच्या आत हा स्प्रे वापरण्यास देण्यात आला. त्याचवेळी उर्वरित ५० टक्के रुग्णांना प्लासिबो देण्यात आले.
हा स्प्रे वापरलेल्या रुग्णांमध्ये इतरांच्या तुलनेत चार दिवस आधी करोना बरा झाल्याचे दिसून आले. पहिल्या २४ तासांमध्ये या रुग्णांच्या शरीरातील करोना विषाणूचा भार ९४ टक्के तर ४८ तासांमध्ये ९९ टक्के कमी झाल्याचे दिसून आले. हे औषध प्रामुख्याने रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसलेल्या करोना रुग्णांसाठी उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले. करोना प्रतिबंधात्मक लस न घेतलेल्या रुग्णांमध्येही या स्प्रेची परिणामकारकता समान असल्याचा दावा ग्लेनमार्ककडून करण्यात आला आहे.