लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : रंग-रेषांनी कॅनव्हासवर रेखाटलेली चित्रे आपण नेहमीच पाहतो. पण, आजूबाजूला आढळणाऱ्या विविधरंगी दगडांमधून चित्रांचे वेगळे जग निर्माण करणाऱ्या प्रस्तर कलाकार आणि लेखिका अनिता दुबे यांनी महात्मा गांधी यांचे जीवनकार्य अशा चित्रांतून आविष्कृत केले आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ट्रस्टतर्फे शुक्रवारपासून (७ मार्च) गांधी भवन येथे आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनात दुबे यांची चित्रमालिका पाहण्याची संधी मिळणार आहे.

मूळच्या भोपाळ येथील अनिता दुबे सध्या खराडी येथे वास्तव्यास आहेत. लहानपणापासून विविधरंगी आणि वेगवेगळ्या आकारांचे दगड वेचण्याच्या आवडीतून त्यांनी दगडांपासून चित्र काढण्याची कला विकसित केली. त्यांनी साकारलेल्या चित्रांची मालिका रविवारपर्यंत (९ मार्च) सर्वांना पाहता येणार आहे.

दुबे म्हणाल्या, ‘माझे बालपण भोपाळमध्ये गेले. उन्हाळी सुटीत मी आईसोबत अजोळी गेल्यानंतर नर्मदा नदीच्या किनारी आम्ही फिरण्यासाठी जात असू. नर्मदेच्या पात्रातील विविधरंगी आणि वेगवेगळ्या आकारांचे गोटे उचलण्याची आणि त्यांचा संग्रह करण्याची सवय मला लागली. त्यातूनच चित्र साकारण्याची कल्पना सुचली. विवाहानंतर अजोळी जाणे कमी झाले. त्यामुळे नर्मदा नदीशी नातेही दुरावले. हवाई दलामध्ये असलेल्या पतीची बदली झाल्यावर नवीन राज्यात आणि शहरात, तसेच दुर्गम भागात जावे लागायचे. या प्रवासात मी ठिकठिकाणचे खडे, दगड गोळा केले. पुण्यात वास्तव्यास असताना एका लष्करी अधिकाऱ्याने मला दोन पोती खडे दिले.’

‘गांधीजींच्या साहित्य वाचनातून त्यांच्या विचारांचा, कार्याचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यातून ही चित्रे काढण्याची कल्पना मला सुचली. बापूंच्या जीवनकार्यावर मी ५० चित्रे काढली आहेत. या चित्रांमधील खडे विविधरंगी आहेत. त्यांचा मूळ रंग कायम ठेवण्यात आला आहे. दगड आणि काड्यांचा वापर करून ही चित्रे रेखाटली आहेत. महात्मा गांधी यांना आफ्रिकेत आलेला वर्णद्वेषाचा अनुभव, त्यांचे भारतातील आगमन, स्वातंत्र्य चळवळ, कपड्यांचा त्याग, अहिंसा-सहिष्णुता-सत्याग्रह अशा घटना आणि मूल्यांचे दर्शन या चित्रांमधून घडते. हे प्रदर्शन यापूर्वी भोपाळ, दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र आणि पुण्यात हे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले आहे,’ असे दुबे यांनी सांगितले.

प्रस्तरकला म्हणजे काय?

‘दगडांना संस्कृतमध्ये प्रस्तर म्हणतात. दगड कापणे, छाटणे आणि आकार तयार करण्यासाठी कोरीव काम करण्याला शिल्पकला म्हणतात. तर दगडांना त्यांच्या मूळ स्वरूपापासून (कणानुसार) मोठ्या आकारात बदलून कोणतीही कापणी आणि छाटणी न करता कलाकृती तयार करण्याचे काम म्हणजे दगडी कला. ज्यामध्ये वेगवेगळ्या आकारांच्या आणि प्रकारच्या दगडांचा वापर करून चित्रे काढली जातात,’ असे अनिता दुबे यांनी सांगितले.

Story img Loader